निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
By यदू जोशी | Published: May 5, 2024 08:49 AM2024-05-05T08:49:21+5:302024-05-05T08:49:39+5:30
परंपरागत विरोधकांची मनधरणी करण्याची आली त्यांच्यावर वेळ, लोकशाहीच्या खेळात घराणेशाहीची कसोटी
यदु जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुठे पत्नी, पती कुठे बहीण, सून तर कुठे मुलगी लोकसभा निवडणुकीत भाग्य अजमावत असताना पती, भाऊ, सासरे अन् वडिलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बारामतीत मुलीसाठी मते मागणाऱ्या वडिलांना कौल मिळणार की पत्नीसाठी रात्रंदिवस मेहनत घेणारा पती विजयाचा गुलाल उधळणार याची उत्सुकता आहे.
अख्ख्या महाराष्ट्राचे सर्वांत जास्त लक्ष लागले आहे ते बारामतीकडे. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या सामन्याचा निकाल एकाचवेळी अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा ठरणार आहे. वेगवेगळ्या कारणांनी आपल्यापासून दुरावलेल्यांची मनधरणी करण्याची वेळ पवार काका-पुतण्यावर आली आहे. इतर काही मतदारसंघांमध्येही दुरावलेल्यांना जवळ केले जात आहे.
नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डाॅ. हीना गावित भाजपकडून लढताहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा जिल्हा भाजपकडे खेचून आणण्यात विजयकुमार गावित यांची मोठी भूमिका राहिली आहे. यावेळी शिंदेसेनेचे नेते डॉ. हीना यांच्यासाठी तेवढे प्रयत्न करत नसल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल मैदानात आहेत. गावित आणि भाजपच्या साम्राज्याला ते आव्हान देत आहेत. गावित यांची मुलीसाठी तर पाडवी यांची मुलासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बीडमध्ये एका बहिणीसाठी भावाची शक्तिपरीक्षा आहे. कालपर्यंत ते एकमेकांचे विरोधक होते. अर्थातच भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू मंत्री धनंजय मुंडे. एकूणच मुंडे घराण्याची इथे कसोटी लागली आहे ती शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांच्या विरोधात. राजकारणात काहीवेळा दोन अधिक दोन चार होत नाही म्हणतात पण मुंडे बंधू्-भगिनी ते सिद्ध करण्यासाठी श्रम घेत आहेत. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे पुन्हा जिंकणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कमालीच्या प्रतिष्ठेचा विषय आहे.
पवार घराण्यावर वर्चस्व कोणाचे अन् बारामती कोणासोबत? मोहिते पाटील घराण्याचा दबदबा आहे की नाही? उस्मानाबादचा गड डॉ. पद्मसिंह पाटलांचा की कट्टर विरोधक ओमराजे निंबाळकरांचा?, मुंडे बंधू-भगिनी एकत्र आल्याचा फायदा कितपत झाला? नंदुरबारमध्ये
दबदबा कोणाचा? वार्धक्यात सुशीलकुमार शिंदेंना मुलीचा विजय बघायला मिळणार का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही निवडणूक देणार आहे.
मुलीसाठी सुशीलकुमारांचे कष्ट
सोलापुरात ८३ वर्षांचे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना मुलगी प्रणिती (काँग्रेस) यांच्या विजयासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत. उस्मानाबादमध्ये एकाचवेळी सासरे आणि मुलाचे राजकारण दाव्यावर लागले आहे. अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह आणि त्यांचे वडील माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. वडील सुनील तटकरे यांच्या विजयासाठी रायगडमध्ये महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांना दिवसरात्र एक करावी लागत आहे. यवतमाळ-वाशिममध्ये राजश्री पाटील यांना प्रचारासाठी कमी दिवस मिळाले, त्यांचे पती खा. हेमंत पाटील यांना बदललेल्या मतदारसंघात कसरत करावी लागली. वर्ध्यात शरद पवार गटाचे अमर काळेंसाठी त्यांचे मामा माजी मंत्री अनिल देशमुख तळ ठोकून होते.
सुनेसाठी जीवाचे रान....
रावेरमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपच्या उंबरठ्यावर उभे आहेत. स्नुषा रक्षा खडसे यांच्या पाठीशी त्यांनी आपले बळ उभे केले आहे. माढा मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने मोहिते घराण्याच्या राजकीय भवितव्याचा फैसला होत आहे. अहमदनगरमध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विजयासाठी घाम गाळावा लागत आहे.