खंजीर खुपसल्या शिवाय पवारांना सत्ता मिळवल्याचं उदाहरण दुर्मिळ, तूर्तास...; भाजप आमदाराचा सुप्रिया सुळेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 12:25 PM2022-09-29T12:25:21+5:302022-09-29T12:26:38+5:30
'शरद पवार विरोधात गेले, की ते दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात.'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे या आपल्या पक्षाबद्दल नेहमीच विश्वास दाखवत असतात आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय चातुर्याचेही नेहमीच कौतुक करत असतात. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात निरनिमगाव येथे एका जाहीर सभेत बोलताना, 'शरद पवार विरोधात गेले, की ते दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही. काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात. २०१९ च्या निवडणुकांवेळी अशीच प्रचिती आली होती. शरद पवारांचा दौरा झाला अन् राष्ट्रवादीला बऱ्यापैकी यश मिळाले होते. त्यानंतर, ते सत्तेतही आले, असे भाष्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. यावर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे यांना टोला लगावताना, दौरे काढून पवारांना सत्ता कधी मिळाली? असा सवाल भातखळकर यांनी केला आहे. "तूर्तास बारामती टिकेल एवढं पाहा... दौरे काढून पवारांना सत्ता कधी मिळाली? खंजीर खुपसल्या शिवाय आणि लोटांगण घातल्या शिवाय त्यांनी सत्ता मिळवल्याचे उदाहरण दुर्मिळ आहे," असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
आणखी काय म्हणाल्या होत्या सुप्रिया -
निवडणुकीमध्ये पडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेलं नाही. कारण शरद पवार यांचं राजकारण आणि समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आलेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्षे विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते की महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलंच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिलं आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.