अखेर अडीच वर्षानंतर वनवास संपला; राम शिंदे यांची विधानपरिषदेत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 09:57 PM2022-06-20T21:57:00+5:302022-06-20T21:58:13+5:30
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा ४५ हजार मतांनी पराभव झाला. अडीच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिली. अखेर सोमवारी ते निवडून आले.
अहमदनगर- विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर प्रा. राम शिंदे यांना अडीच वर्षे वनवास भोगावा लागला. अखेर पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. सोमवारी मतदान झाले आणि त्यात ते निवडून आले. त्यांच्या कारकिर्दीवर एक प्रकाशझोत.
शेतकरी ते प्राध्यापक -
प्रा. राम शिंदे यांचा जन्म १ जानेवारी १९६९ रोजी चौंडी येथील गरीब शेतकरी कुटुंबात झाला. वडील शंकरराव हे शेतमजूर. दुसऱ्याच्या शेतात सालकरी गडी म्हणून काम करण्यातच अर्धे आयुष्य गेले. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रा. शिंदे यांची जडणघडण झाली. परिस्थितीवर मात करत प्रा. शिंदे यांनी एम. एस्सी. बीएडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. प्रा. राम शिंदे यांनी प्राध्यापक म्हणून आष्टी (जि. बीड) येथे प्रारंभीच्या काळात नोकरी केली.
सरपंच ते मंत्री -
सन १९९५ मध्ये तत्कालिन ग्रामविकासमंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी विकास प्रकल्पाची जबाबदारी प्रा. राम शिंदे यांच्यावर सोपवली. १९९७मध्ये भाजपातर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून निवडणूक लढवली. २०० मतांनी पराभव स्वीकारावा लागला. सन २०००मध्ये चौंडी ग्रामपंचायत निवडणूक लढवून सलग पाच वर्षे सरपंचपद मिळवले. २००२ जामखेड कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभव. सन २००६मध्ये भाजपाच्या जामखेड तालुकाध्यक्षपदी निवड. सन २००७मध्ये पत्नी आशा शिंदे या भाजपातर्फे पंचायत समितीच्या जवळा गणातून विजयी झाल्या. सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत दहा हजार मतांनी विजयी झाले. अहमदनगर भाजपा जिल्हाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस अशी जबाबदारी.
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत प्रा. शिंदे ४५ हजार मतांनी दुसऱ्यांदा निवडून आले. प्रारंभी राज्यमंत्री म्हणून गृह, पणन, आरोग्य व पर्यटन खात्याचे काम. नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून मृद व जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, पणन व वस्त्रोद्योग या खात्याचे मंत्री. नगर जिल्ह्याचे पाच वर्षे पालकमंत्री.
पवार यांच्याकडून पराभव -
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा ४५ हजार मतांनी पराभव झाला. अडीच वर्षांच्या राजकीय वनवासानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिली. अखेर सोमवारी ते निवडून आले.