चेहरा बोलेल... ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञान आरोग्यक्षेत्राला नवी दिशा देईल
By योगेश पांडे | Published: February 5, 2023 03:00 PM2023-02-05T15:00:33+5:302023-02-05T15:01:43+5:30
आरोग्य क्षेत्रात येऊ घातलेले ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हे नवे तंत्रज्ञान आरोग्यक्षेत्राला नवी दिशा देईल आणि रुग्णांची दशा संपेल, असे सांगितले जात आहे. डॉक्टर भविष्यात फक्त तुमचा चेहरा बघून आजार सांगतील. काय आहे ही जादू?
योगेश पांडे, मुख्य उपसंपादक, नागपूर
नायक थकूनभागून घरी येतो अन् त्याची आई त्याला विचारते, ‘तुम्हाला चेहरा देख कर लग रहा है की सिरदर्द है, चलो मैं तुम्हे दवाई देती हूँ’... चित्रपटात अशी दृश्ये आपण अनेकदा बघितलीत. त्याच्यावर ‘मीम्स’देखील तयार होताना दिसतात. मात्र खरोखरच चेहरा पाहून आजार कळू शकला तर...? तशी ही भन्नाटच कल्पना! पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ही बाब खरोखर शक्य होणे अगदी दृष्टिपथात आले आहे. चेहराच काय, अगदी तुमचे चालणे, धावणे, आवाज यांतून आजारांचे निदान करून लवकरात लवकर उपचार सुरू करणे शक्य झाले आहे. केवळ विकसित देशांमध्येच नव्हे तर अगदी भारतातील अनेक शहरांत यावर संशोधन सुरू असून, भविष्यात मशिन्स या डॉक्टरांचे बहुतांश काम करताना दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको.
ही कुठली जादू नसून ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ची करामत आहे. या तंत्रज्ञानाने जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये शिरकाव केला असून, या माध्यमातून भविष्यात सगळीकडे आमूलाग्र बदल दिसून येणार आहेत. कोरोनानंतर आरोग्य क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरणार असल्याचे सध्या सुरू असलेल्या संशोधनांवरून दिसून येते. विशेषतः असाध्य आजारांचे निदान व त्यांच्यावरील उपचार ही प्रक्रिया वेग घेईल व त्यातून अनेकांचे प्राण वाचविण्यात यश येईल, अशीच तज्ज्ञांची अपेक्षा आहे. सर्वांत जास्त महत्त्व हे आजाराच्या योग्य व वेळेवर होणाऱ्या निदानाला असते. अनेकदा लोक विविध कारणांमुळे वैद्यकीय तज्ज्ञांकडे जाण्याचे टाळतात अन् आजार बळावल्यावर उशीर होऊन उपचारांचा ‘गोल्डन पीरिअड’ संपून जातो आणि दवासोबत ‘दुआ’वरच भर असतो.
चेहरा : कावीळ, ह्रदयविकार, श्वसनाच्या १४ आजारांचे निदान शक्य
आवाज : हृदयरोगासह स्ट्रोक, टीबी, श्वसनाच्या आजारांचे निदान शक्य
चालणे : मानसिक, हृदयाशी संबंधित सुमारे १६ आजारांचे निदान शक्य.
शेगावात लोक धावतात अन् आजार कळतो...
विदर्भाच्या मातीतील तीर्थक्षेत्र शेगाव येथेदेखील ‘एआय’च्या तंत्रज्ञानावर प्रयोग सुरू आहेत. शेगाव येथे ‘इनोव्हेशन सेंटर’ उभारण्यात आले असून, तेथे लोकांच्या धावण्याच्या प्रक्रियेचे ‘एआय’च्या माध्यमातून विश्लेषण करून आजारांचे निदान करण्याचा प्रयोग सुरू आहे.
यंत्र भविष्यातील वैद्यकीय तज्ज्ञ
सध्या ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून मधुमेह, कर्करोगाचे निदान शक्य झाले आहे. आवश्यक उपकरणे, औषधांचे उत्पादन, संशोधन, चाचण्या, वितरण, इत्यादी प्रक्रिया ‘एआय’च्या माध्यमातून वेगळ्याच उंचीवर जात आहेत. जगात कुठेही बसलेली व्यक्ती केवळ आवाजाचे नमुने देऊन विशिष्ट आजार संसर्ग झाला आहे का याची चाचणी करू शकते.
‘आर्टिफिशिअल ह्युमेंटिलिजन्स’
या तंत्रज्ञानातून गरीब जनतेला फायदा मिळेल का, यातून वैद्यकीय क्षेत्राचा सेवाभाव कायम राहील का याचाही सारासार विचार होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान अन् माणुसकी यांचा सुवर्णमध्य साधत ‘आर्टिफिशिअल ह्युमेंटिलिजन्स’ विकसित करणे हीच काळाची गरज राहणार आहे.