विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची तोंडे समोर हवीत; महायुतीच्या मेळाव्यात चुकांची दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 12:39 PM2024-08-15T12:39:44+5:302024-08-15T12:44:11+5:30

निवडणुकीत महायुतीचा एकच गमछा ठेवून त्यावर तिन्ही पक्षांचे चिन्ह ठेवा असाही सल्ला

The faces of the leaders should be in front of the Assembly Confession of mistakes in Mahayuti meeting | विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची तोंडे समोर हवीत; महायुतीच्या मेळाव्यात चुकांची दिली कबुली

विधानसभेच्या तोंडावर नेत्यांची तोंडे समोर हवीत; महायुतीच्या मेळाव्यात चुकांची दिली कबुली

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना प्रमुख नेत्यांची तोंडे विरुद्ध दिशेला असू नयेत, त्यांची तोंडे एकमेकांसमोर असायला हवीत, असा सल्ला माजी खासदार कपिल पाटील यांनी बुधवारी महायुतीच्या बैठकीत दिला. राज्यातील सरकारला सव्वादोन वर्षे झाली, तरीसुद्धा लोकांना महायुतीचे सरकार का हवे, हे सांगावे लागत आहे, हे योग्य नाही, असेही पाटील म्हणाले.

मायक्रो लेव्हलला लोकांचे महायुतीवरील प्रेम कमी झाले आहे. आपल्या हातून घडलेल्या चुकांचा हा परिणाम आहे. महायुतीला काठावरील नव्हे घवघवीत यश हवे असल्याने त्यासाठी एकजूट हवी, असा सल्ला आमदार गणेश नाईक यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्याच पुन्हा न करता एकमेकांशी समन्वय साधून काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

ठाण्यात बुधवारी सकाळी महायुतीचा समन्वय मेळावा पार पडला. त्याला प्रमुख मार्गदर्शक, तसेच कोकण विभागाचे समन्वयक उद्योगमंत्री उदय सामंत, प्रसाद लाड, आमदार गणेश नाईक, अनिकेत तटकरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार कपिल पाटील आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसभेत ठाणे, पालघर, कल्याण या तीन जागा निवडून आल्या, परंतु भिवंडीची जागा पडली. विधानसभा निवडणुकीत अशा चुका होता कामा नये, असा सल्ला खासदार नरेश म्हस्के यांनी दिला.

२४ ऑगस्टपासून प्रचारयात्रा : लाड

महायुतीच्या माध्यमातून येत्या २४ ऑगस्टपासून प्रचार यात्रेला सुरुवात होणार असल्याची माहिती लाड यांनी दिली. ठाण्यातूनच पहिली प्रचार यात्रा निघणार असून, पालघर नवी मुंबई अशी ही यात्रा जाईल. ‘एकजूट महाराष्ट्रासाठी, अभियान विकासासाठी, कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेऊन महायुती राज्यभर प्रचार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोशल मीडिया आर्मी तयार करून त्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्हला उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्के : सामंत

लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह लोकापर्यंत पोहोचविण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली होती, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. कोकणात ७४ जागा असून, त्या सर्व महायुती लढणार आहे. महायुतीचा स्ट्राइक रेट ८५ टक्क्यांपेक्षा पुढे असेल, असा दावा त्यांनी केला.

महायुतीचा एकच गमछा

निवडणुकीत महायुतीमधील प्रत्येक पक्ष वेगवेगळा गमछा घालून प्रचार करीत असतात. त्यातून काही वेळेस नेत्यांमध्ये भांडणे होतात. महायुतीचा एकच गमछा ठेवा आणि त्यावर तिन्ही पक्षांचे चिन्ह ठेवा, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.

Web Title: The faces of the leaders should be in front of the Assembly Confession of mistakes in Mahayuti meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.