गळ्यात रुद्राक्ष माळ घालत उद्धव ठाकरेंसह कुटुंबानं घेतले काळाराम मंदिरात दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 07:08 PM2024-01-22T19:08:14+5:302024-01-22T19:08:46+5:30
उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील रूद्राक्ष माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले
नाशिक - अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आता देशभरात ठिकठिकाणी रॅली, दिपोत्सव साजरा केला जात आहे. त्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाकडून नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेण्यात आले. नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे पोहचले होते. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्तेही पंचवटी भागात दाखल झाले. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्याठिकाणी पूजा करून महाआरतीही केली.
यावेळी उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील रूद्राक्ष माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत रूद्राक्षाची माळ कायम जपली. तीच परंपरा पुढे घेऊन उद्धव ठाकरे पुढील प्रवास करणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात ठाकरे कुटुंबाने प्रभू श्री रामांची आरती केली. तसेच आपल्या देशात महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी प्रभू श्रीरामांचरणी नतमस्तक होऊन उद्धव ठाकरेंनी साकडे घातल्याचे सांगण्यात येत आहे.
"जो राम का नहीं, वो किसी काम के नहीं", शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
"जे लोक रामाचे नाहीत, ते कामाचे नाहीत. ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो. काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. सर्वांनी या सोहळ्यात सहभागी झाले पाहिजे. पण काही लोक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, 'जो राम के नहीं, वो काम के नहीं असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
भाजपानंही केली टीका
भाजपाने उद्धव ठाकरेंवर यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. "ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?" असा खोचक सवाल भाजपा नेते आशिष शेलार यांनी विचारला आहे. तसेच "आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा... उबाठा शाखा अंधारात आणि गोदातिरावर थयथयाट. जो न रहा राम का, वो न किसी काम का!" असंही म्हटलं आहे.