बदलापूरातील पीडित मुलीच्या कुटुंबाने मानले राज ठाकरेंचे आभार; "त्यांनी आमच्या..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 05:53 PM2024-08-25T17:53:02+5:302024-08-26T11:13:58+5:30
बदलापूरातील घटनेनंतर राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले. मात्र त्या पीडित कुटुंबाने जो धक्कादायक अनुभव शेअर केला तो अंगावर काटा आणणारा आहे.
बदलापूर - गेल्या काही दिवसांपासून बदलापूर प्रकरण राज्यासह देशभरात चर्चेत आहे. याठिकाणी चिमुरडीवर झालेल्या अत्याचारानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बदलापूरातील घटना समोर आणि राज्यात खळबळ माजली. बदलापूर बंद, त्यानंतर झालेले राजकीय आंदोलन या सर्व घडामोडीत पीडित मुलीच्या कुटुंबाने सोसलेल्या यातना भयंकर होत्या. पीडित कुटुंबाने त्यांना आलेला कटू अनुभव समोर मांडला आणि त्यासोबत मनसे प्रमुख राज ठाकरेंचे आभार मानले आहेत.
बदलापूर प्रकरणात कशारितीने पोलीस आणि शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला हे पीडित कुटुंबाच्या दाव्याने उघडकीस आले आहे. या घटनेतील पीडित मुलीच्या आईने सांगितले की, १३ तारखेला मला शाळेतून फोन आला तुमची मुलगी खूप रडते, तिला घ्यायला या. माझे वडील तिला घ्यायला गेले. तिला व्यवस्थित चालता येत नव्हते. रात्री तिला ताप आला, १४ तारखेला मी तिला दवाखान्यात घेऊन गेले. त्याचदिवशी माझ्या मुलीच्या मैत्रिणीच्या वडिलांनी माझ्या पतीला तिच्यासोबत शाळेत काहीतरी घडलंय असं सांगितले. माझी मुलगी रडायची, झोपेत हातवारे करायची. त्यामुळे माझ्या पतीला संशय आला असं त्यांनी सांगितले.
तर १५ तारखेला माझे पती मुलीला दवाखान्यात घेऊन गेले. तिथल्या महिला डॉक्टरांनी तपासणी केली. तेव्हा डॉक्टरांनी तिच्या प्रायव्हेट पार्टला १ सेंटीमीटरपर्यंत इजा झालीय. कुणीतरी काहीतरी केलंय असं त्यांनी सांगितले. त्यांनी आम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. आम्ही मुलीला घरी आणलं. कुणी तुला हात लावलाय का असं विचारलं. त्यावेळी एक दादा तो मला हात लावतो, गुदूगुदू करतो, मारतो पण असं सांगितले असं आईने म्हटलं.
दरम्यान, आम्हाला शाळेत कुणी विचारणार नाही म्हणून आम्ही १६ तारखेला मनसेच्या पदाधिकारी संगीताताई यांना भेटलो. त्यांना लेखी निवेदन दिले. त्यानंतर आम्ही सगळे पोलीस स्टेशनला गेलो. दुपारी साडे बारा सुमारास आम्ही पोहचलो. आम्हाला शाळेविरोधात तक्रार करायची आहे असं आम्ही शितोळे मॅडमला सांगितले. त्यांनी मुलीला नाव विचारलं, मुलगी घाबरली होती. मुलीने पोलिसांना सांगितले. काठीवाला दादा गुदूगुदू करतो, वॉशरुममध्ये मारहाण केली असंही सांगितले. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. आम्ही खासगी डॉक्टरांचे रिपोर्टही दाखवले असं पीडित मुलीच्या आईने सांगितले. ही सर्व घटना एबीपी माझाशी बोलताना कुटुंबाने व्यक्त केली आहे.
शाळेवर गंभीर आरोप
आम्ही शाळेत गेलो तेव्हा आम्हाला कुणी पुरुष ठेवलेच नाहीत असं प्रिन्सिपल बोलले होते. आमच्या शाळेत असं काही घडू शकत नाही असं आम्हाला सांगितले. १०-१५ मिनिटानंतर त्यांनी विषय बदलला. आमचे सीसीटीव्ही बंद आहेत. कॅमेरा चालू आहे पण रेकॉर्डिंग होत नाही असं प्रिन्सिपल यांनी सांगितले असं पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले.
पीडित कुटुंबाने मानले राज ठाकरेंचे आभार
आमच्यावर सध्या मानसिक दबाव खूप जास्त आहे. यातून बाहेर काढण्यासाठी मुलीला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतोय. मुलगी झोपते पण दचकून जागी होते. मला या शाळेत जायचं नाही असं ती म्हणते. आमची मुलगी व्यवस्थित राहावी याला आमचे प्राधान्य आहे. तिचं आयुष्य पुढे आहे. मी राजसाहेब ठाकरेंचा खूप मनापासून आभारी आहे. त्यांनी आमच्या भावना समजून घेतल्या आणि आम्हाला मदत केली असं पीडित कुटुंबाने म्हटलं आहे.