Dilip Walse Patil On Loudspeaker : भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार - दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2022 05:01 PM2022-04-20T17:01:17+5:302022-04-20T17:03:16+5:30

Dilip Walse Patil On Loudspeaker : कायदा हाती घेण्याचा प्रयत्न झाल्यास कठोर कारवाई होणार, गृहमंत्र्यांचा इशारा.

The final decision will be taken after discussions with the leaders of all the opposition party leaders and organizations Dilip Walse Patil on loudspeaker commented on raj thackeray rally 1 may aurangabad | Dilip Walse Patil On Loudspeaker : भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार - दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil On Loudspeaker : भोग्यांविषयी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, संघटनांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार - दिलीप वळसे पाटील

googlenewsNext

Dilip Walse Patil On Loudspeaker : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यादरम्यान मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित केला. तसंच त्यानंतर ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या उत्तर सभेतही त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. ३ मे पर्यंत हे भोंगे न काढल्यास त्या समोर हनुमान चालीसा लावली जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान, आता या मुद्द्यावरुन राजकारण तापत असून सरकारही अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

“यासंदर्भात पोलीस महासंचालकांनी एक बैठक घेतली. याचा अहवालही त्यांनी दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात जी परिस्थिती उद्भवू शकते त्या संदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून, अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून काय तयारी केली याचा आढावा त्यांनी दिला आहे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्याचा ही जबाबदारी आमच्यावर आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सुरू आहे. त्याबाबतीत सरकार अतिशय गंभीर आहे. कायदा कोणी हाती घेण्याचा प्रयत्न करू नका ही सर्वांना विनंती आहे. संघर्ष वाढवू नका, तेढ निर्माण करू नका. अशी कृती झाल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा वळसे-पाटील यांनी दिला.

"हा प्रश्न काही नवा नाही"
“हा निर्माण झालेला प्रश्न हा काही नवीन नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा २००५ चा निर्णय आहे. त्यानंतर २०१५, २०१७ मध्ये राज्यानं काही जीआर काढले आहेत. त्या जीआरमध्ये लाऊडस्पीकरच्या संदर्भातील पद्धत ठरवून दिली आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भातील सूचना संबंधितांना देण्यात येतील. यासंदर्भातील अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवून याबाबत चर्चा केली जाईल. काही संघटनांशी बैठक बोलावून त्यांच्यासोबतही चर्चा केली जाईल. त्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

औरंगाबाद पोलीस आयुक्त निर्णय घेतील
राज ठाकरे हे १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत. त्यांनी यासंदर्भात घोषणाही केली होती. परंतु त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीसह काही जणांकडून करण्यात आली. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना “अशा प्रकारची कोणतीही निवेदनं गृहखात्याकडे आलेलं नाही. ती औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांकडे आली आहे. ते परिस्थिती पाहूनच निर्णय घेतील,” असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

Web Title: The final decision will be taken after discussions with the leaders of all the opposition party leaders and organizations Dilip Walse Patil on loudspeaker commented on raj thackeray rally 1 may aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.