समृद्धीचा अंतिम टप्पा, सप्टेंबरअखेर सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 02:16 PM2024-08-10T14:16:47+5:302024-08-10T14:17:21+5:30
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इगतपुरी ते आमने हा प्रवास सव्वा तासात पूर्ण करता येणार आहे.
मुंबई : महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा ७६ किमी लांबीचा टप्पा येत्या सप्टेंबरअखेर पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इगतपुरी ते आमने हा प्रवास सव्वा तासात पूर्ण करता येणार आहे. तर नाशिक ते ठाणे हा प्रवास समृद्धीवरून अडीच तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे. या शेवटच्या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट पूल आणि बोगद्यांचा समावेश आहे. त्यामध्ये ८ किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश असून हा आशियातील आतापर्यंतचा सर्वाधिक अशा १७.६ मीटर रुंदीचा बोगदा ठरणार आहे. तसेच त्याची उंची ९.१२ मीटर राहणार असून हा बोगदा सुरू झाल्यावर घाट केवळ आठ मिनिटात पार करता येणार आहे. त्यातून वाहतुकीच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. या बोगद्यात आगीची घटना घडताच स्वयंचलित स्प्रिंकलरद्वारे आग विझविली जाणार आहे. तसेच डेन्मार्क तंत्रज्ञानाने युक्त अशी यंत्रणा बोगद्यात उभारण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गावरील हा ७६ किमीचा टप्पा सर्वात किचकट आहे. यामध्ये तब्बल १७ दऱ्या आहेत. त्यावर १७ पुलांची उभारणी केली आहे. त्यांची एकत्रित लांबी तब्बल ११.५ किमी आहे. सर्वाधिक लांबीचा व्हॅलीपूल २.२८ किमी लांबीचा असून तो भातसा नदीवर उभारण्यात आला आहे.