समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 06:26 AM2024-05-28T06:26:08+5:302024-05-28T06:26:28+5:30
काही महिन्यांपूर्वीच एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किमीचा मार्ग सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समृद्धी महामार्गावरून मुंबई ते नागपूर असा सलग प्रवास करणे आता शक्य होणार आहे. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटचा ७६ किमी लांबीचा टप्पा येत्या ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नियोजन केले असून एका पुलाची उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्यातील मार्गावर अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट पूल आणि बोगद्यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत यातील बोगद्यांची आणि रस्त्यांचे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र ठाण्यातील खर्डी येथील एका जवळपास १.५ किमी लांबीच्या पुलाचे काम अद्याप बाकी आहे. प्रत्येक बाजूच्या वाहतुकीसाठी चार लेनचा हा पूल आहे. हा पूल ८२ मीटर उंच असून त्यावर गर्डर स्पॅन उभारण्याचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. हे काम अवघड असल्याने पुलाच्या उभारणीसाठी ऑक्टोबर उजाडणार आहे. मात्र त्याआधी ऑगस्टपर्यंत या पुलाची एक बाजू उभारण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले आहे. त्यानंतर पुलाच्या एका बाजूवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू केली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत शेवटच्या टप्प्यातील ९७ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वीच एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किमीचा मार्ग सुरू केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहचत आहेत.