...आणि अक्षता भावाच्या हातात राहिल्या; पाहुण्यांवर अंत्यसंस्काराला जाण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 05:00 PM2022-05-28T17:00:31+5:302022-05-28T17:00:41+5:30
बोरगाववाडी येथील पाटील कुटुंबियांतील मुलीचे लग्न कोडणी येथील बुदिहाळे कुटुंबातील मुलाशी स्तवनिधी येथील कार्यालयात आयोजित केले होते.
दादा जनवाडे
निपाणी : बहिणीच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी आतूर असलेला आणि बहिणीच्या लग्नामुळे आनंदी असलेला भाऊ, लाडक्या पुतणीला सासरी पाठविण्यासाठी व तिच्या लग्नामुळे आनंदी असलेले चुलता-चुलती व नातीच्या डोक्यावर अक्षता टाकून तिला शुभाशिर्वाद देण्यासाठी लग्न मंडपाकडे निघालेली आजी या सर्वांवर काळाने झडप घातली आणि लग्नासाठी घातलेल्या मंडपात दुःखाची लाट पसरली. अक्षता टाकण्याची संधी तर भावाला, चुलत्याला मिळाली नाहीच, पण त्यांचा आशीर्वाद आणि भावाकडून सासरी जाण्यासाठी निरोप घेण्याचे भाग्यही नवरी मुलीला मिळाले नाही. लग्नासाठी आलेल्या पाहुणे व मित्रपरिवारावर लग्नघरातील लोकांचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. ही दुर्दैवी घटना बोरगाववाडी येथील पाटील कुटुंबियांच्या बाबतीत घडली आहे.
बोरगाववाडी येथील पाटील कुटुंबियांतील मुलीचे लग्न कोडणी येथील बुदिहाळे कुटुंबातील मुलाशी स्तवनिधी येथील कार्यालयात आयोजित केले होते. लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. साडेअकराच्या मुहूर्तावर अक्षता पडणार असल्याने पाहुणे, मित्रमंडळी यांची धावपळ सुरू होती. याचवेळी नवरी मुलीची चुलती छाया आदगोंडा पाटील, चुलते आदगोंडा बाबू पाटील व भाऊ महेश देवगोंडा पाटील हे सर्वजण आजी चंपाताई मगदूम यांच्यासह लग्न मंडपाकडे जात होते. यावेळी भरधाव कंटेनरने धडक दिल्याने या चौघांचा मृत्यू झाला.
लग्नाचे ठिकाण केवळ अर्धा किलोमीटर दूर असताना कुटुंबातील चौघांचा असा मृत्यू झाल्याने बोरगाववाडीसह पंचक्रोशीत दुःखाची छाया पसरली आहे. मृत चौघांवर एकाचवेळी एकाच ठिकाणी बोरगाववाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. काल ज्या घरात लग्नासाठी आनंदाने गडबड सुरू होती, त्याच दारात आज आक्रोश करण्याची दुर्दैवी वेळ पाटील कुटुंबियांवर आली. या घटनेने संपूर्ण गाव सुन्न झाला आहे. कालपर्यंत ज्या घराला आनंदाचे तोरण होते, त्या घरातून चौघांचे मृतदेह न्यावे लागतील, ही कल्पनाच सहन होत नसल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते. इकडे स्वतःच्या मुलीच्या लग्नादिवशी मुलाचा मृत्यू पाहण्याचा दुर्दैवी योग आई-वडिलांच्या नशिबी आला. ‘देव एवढा निष्ठूर असतो का?’ असा मेसेजही सोशल मीडियात दिवसभर फिरत होता.
पाटील कुटुंबीय हे प्रतिष्ठित कुटुंबीय. लग्नासाठी गावातील लोकांनाही कार्यालयात आमंत्रित करण्यात आले होते. पण लग्नासाठी आलेल्या ग्रामस्थांना अक्षता टाकण्याऐवजी मृतदेह घेऊन गावी परतावे लागले. बोरगाववाडीसह पंचक्रोशीतील ही अतिशय दुःखद व मोठी दुर्घटना आहे. या घटनेने जमलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. पाटील कुटुंबियांच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.