फालतू तक्रार करणाऱ्याने उद्धव ठाकरेंना २ लाख द्यावेत, औरंगाबाद खंडपीठाचे डॉक्टरला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 10:55 AM2024-09-02T10:55:14+5:302024-09-02T10:56:26+5:30
Court News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
- डॉ. खुशालचंद बाहेती
छत्रपती संभाजीनगर - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करणाऱ्या डॉक्टरला औरंगाबाद खंडपीठाने दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
बंजारा समाजाचे महंत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. महंतांनी ठाकरेंना प्रसाद आणि विभूती दिली. ठाकरे यांनी प्रसाद आणि विभूती स्वीकारल्यानंतर ती शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीकडे दिली. यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार नांदेडमधील डॉ. मोहन उत्तमराव चव्हाण यांनी प्रथमवर्ग, न्यायदंडाधिकारी नांदेड यांच्या न्यायालयात केली. न्यायालयाने ही तक्रार फेटाळली. सत्र न्यायालयानेही याविरुद्धचे अपील फेटाळले म्हणून चव्हाण यांनी ॲड. एस.पी. सलगर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. शासनातर्फे सहायक लोकअभियोक्ता प्रीती डिग्गीकर यांनी बाजू मांडल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. जी. मेहरे यांनी निरीक्षण नोंदवले की, ज्याला कायद्याची थोडीशी माहिती आहे, ती प्रत्येक व्यक्ती याला कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग म्हणेल. हा प्रसिद्धी मिळवण्यासाठी न्यायव्यवस्थेचा केलेला वापर आहे.
याचिकादाराच्या आरोपांना आधार नाही
- उच्च न्यायालयाने दोन लाखांचा खर्च लावून याचिका फेटाळण्याचे सूतोवाच केल्यानंतर चव्हाण यांनी याचिका मागे घेत असल्याचे सांगितले.
- न्यायालयाने मात्र माजी मुख्यमंत्र्यांवरील आरोपांना कुठलाही आधार नाही.
- याचिका मागे घेण्यास परवानगी देताना चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांना तीन आठवड्यांत डिमांड ड्राफ्टने दोन लाख रुपये द्यावेत, असे आदेश दिले.