भावी लाडकी बहीण शिक्षणासाठी जीव मुठीत घेऊन ओलांडतेय नदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 10:18 AM2024-07-22T10:18:56+5:302024-07-22T10:19:36+5:30
विकासकामांचा निधी कुठे जातो; संतप्त नागरिकांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : जव्हार व विक्रमगड तालुक्यांच्या हद्दीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा तलवाडा महालपाडा येथे विद्यार्थी व गावपाड्यातील नागरिकांना जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही. परिणामी त्यांना नदीवरील कच्च्या लाकडी पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.
येथील शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नदी ओलांडून जीव मुठीत घेऊन जावे लागते. मात्र, पावसाळ्यात या नदीला नेहमीच पूर येतो, त्यामुळे गावकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात तेथे लाकडी पूल तयार केला आहे, मात्र हा पूल कमकुवत असून, येथे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान गावकऱ्यांनाही शहरात येण्यासाठी हाच मार्ग असल्याने त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकीकडे जिल्ह्यातील विकासकामांसाठी काेटींच्या निधीची तरतूद करण्यात येते, मात्र तो निधी कुठे वापरला जातो, असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
...अन्यथा आंदोलन केले जाईल
महालपाडा येथे जास्त प्रमाणात आदिवासी कातकरी बांधव वास्तव्य करतात. कातकरी समाजासाठी शासनाच्या मोठ्या प्रमाणात योजना आहेत, मात्र आजही कातकरी समाजाला जीवघेणा प्रवास करावा लागतो, ही खेदजनक बाब आहे. याबाबत प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन केले जाईल.
- विलास वांगड, आदिवासी अस्मिता संघटना, पालघर जिल्हाध्यक्ष.