भविष्यात शिवसेना-मनसे अधिक ताकदीनं पुढे जाताना दिसेल; संजय शिरसाटांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 01:32 PM2024-04-10T13:32:11+5:302024-04-10T13:32:39+5:30
एक नेता कसा असावा हे या भेटीत दिसला, १२-१३ वर्षांनी माझी भेट झाली. संघर्षातून नेता घडत असतो. तसं राज ठाकरेंनी संघर्षातून घडत आहेत असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
मुंबई - राज ठाकरेंसोबत आमचे जुने नाते, शिवसेनाप्रमुखांसोबत राज ठाकरे कायम असायचे. आता युतीमुळे अनेक वर्षांनी युतीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित यायला सुरुवात झाली. भविष्यात शिवसेना-मनसे हे मजबुतीनं अधिक पुढे महाराष्ट्रात दिसेल. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जाताना त्याला मोठा पाठिंबा राज ठाकरेंच्या रुपाने मिळाला आहे असं विधान शिवसेना नेते आमदार संजय शिरसाट यांनी केला.
संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेना-मनसे जोमाने येणाऱ्या लोकसभेतच नव्हे तर विधानसभेतही पुढे जाईल. स्वबळावर १३ आमदार निवडून आणणं, एकहाती पक्ष चालवणं, सत्ता नसतानाही कार्यकर्ते टिकवण्याचं कसब राज ठाकरेंकडे आहे. राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या विजयाला बुस्टर डोस मिळाला आहे. माझी भेट झाली त्यात दिल्लीपासून गल्लीतल्या राजकारणावर गप्पा मारल्या. त्यावेळी काही चांगले संकेत मिळाले होते. इतक्या वर्षांनी त्यांची भेट झाली. मनभेद नसावेत हा अनुभव मला तिथे आला असं त्यांनी म्हटलं.
तसेच एक नेता कसा असावा हे या भेटीत दिसला, १२-१३ वर्षांनी माझी भेट झाली. संघर्षातून नेता घडत असतो. तसं राज ठाकरेंनी संघर्षातून घडत आहेत. येणाऱ्या ८ दिवसांत काँग्रेस-उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुम्हाला महायुतीत येताना दिसतील. आम्ही जो उठाव केला तो याच भावनेतून केला, जे सरकार बनलं ते चुकीचे होते असा टोलाही संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी बिनशर्तपणे महायुतीला पाठिंबा दिला. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी असून त्यासाठी सक्षम नेतृत्व हवं असं राज ठाकरेंनी म्हटलं. त्याशिवाय आगामी काळात मोदींनी देशातील तरुणाईकडे लक्ष द्यावे, त्यांना प्रोत्साहन द्यावं, त्यांच्यासाठी नवीन कल्पक असेल ते अंमलात आणावं अशी अपेक्षाही राज ठाकरेंनी व्यक्त केली.