राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 01:58 PM2023-01-24T13:58:45+5:302023-01-24T13:59:20+5:30

Devendra Fadnavis: अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.

The Governor's resignation was discussed, but Devendra Fadnavis gave a different signal, said... | राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत, म्हणाले...

राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा, पण देवेंद्र फडणवीसांनी दिले वेगळेच संकेत, म्हणाले...

Next

मुंबई - अनेक विधाने आणि निर्णय यामुळे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. राज्यपालांनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. विविध नेत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्याची चर्चा जोरात सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र वेगळेच संकेत दिले आहेत. राज्यपालांना राजीनामा देण्यास सांगण्यात आलेले नाही. त्यांना पदावर राहायचे असल्यास ते पाच वर्षे पूर्ण होईपर्यत राहू शकतात. मात्र भगत सिंह कोश्यारी यांनी स्वत:च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्यपालांबाबत प्रश्न विचारण्यात आल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या तीन चार महिन्यांपासून राज्यपाल हे सातत्याने आपल्याला जबाबदारीतून मुक्त करा, असे खासगीत सांगत आहेत. माझी तब्येतही आता साथ देत नाही आहे, असे ते सांगत आहेत. मात्र राज्यपालांना राजीनामा द्यायला सांगितला, असं कुणी म्हणत असेल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. राज्यपालांना जर पदावर राहायचं असेल, तर ते पाच वर्षे इथं राहू शकतात. कुणीही त्यांचा राजीनामा मागितलेला नाही. पण राज्यपालांनी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सांगितलं आहे की, आता मला या पदावर राहणं जमणार नाही. मला परत गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही मला राजीनामा देण्याची परवानगी द्या. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याबाबत व्यक्त केलेल्या इच्छेचा कुठल्या वादाशी संबंध आहे असं मला वाटत नाही.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यपाल जेव्हा पद सोडतील त्यापूर्वी ते सल्ला घेण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. दुसरं असं आहे की, राज्यपाल हेसुद्धा एक व्यक्ती आहेत. त्यामुळे निर्णय घेताना त्यांनी जर पंतप्रधानांचा सल्ला घेतला असेल, तर त्यात मला कही गैर वाटत नाही. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही आरोप केले. राज्यपालांना लक्ष्य करण्यात आलं त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात मविआला जो काही स्वैराचार करायचा होता, तो राज्यपालांनी करून दिला नाही. त्याचेच उट्टे काढण्याचा प्रयत्न त्यांना टार्गेट करून करण्यात आला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

Web Title: The Governor's resignation was discussed, but Devendra Fadnavis gave a different signal, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.