राज्यात बालमृत्यूदराचा आलेख घटला; महाराष्ट्राची कामगिरी समाधानकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:17 AM2022-09-16T07:17:38+5:302022-09-16T07:17:55+5:30
जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणाने तसेच कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे
पुणे : अर्भक मृत्यू, नवजात शिशुमृत्यू व बालमृत्यूमध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी समाधानकारक असून, राज्याचा बालमृत्यूदर गेल्या दशकभरात सातत्याने घटत आहे. सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेच्या गेल्या काही वर्षांच्या अहवालानुसार ही बाब समोर आली आहे.
बाळ जन्मल्यापासून ३० दिवसांच्या
आत त्याचा मृत्यू झाला असेल, तर त्याला अर्भकमृत्यू म्हणतात. अतिसार, स्तनपानाअभावी रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने व बालरोगतज्ज्ञांचा सल्ला न पाळल्यास नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते; परंतु यामध्ये सातत्याने घट होत आहे, अशी माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाने दिली.
जन्मापासून वर्षभरात झालेल्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. विविध कारणाने तसेच कुपोषणाने बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, ही आकडेवारी सातत्याने घटत आहे. त्याचप्रमाणे नवजात मृत्यू कमी होत आहे.
भारतापेक्षा राज्याचा मृत्यूदर कमी
सॅम्पल रजिस्ट्रेशन सर्व्हेनुसार भारताचा नवजात शिशू मृत्यूदर हा २२, तर महाराष्ट्र राज्याचा १३ आहे. तसेच ५ वर्षांखालील बालमृत्यूचा दर देशाचा ३५ असून, महाराष्ट्राचा २१ आहे. तसेच अर्भक मृत्यूदर हा २८ असून, महाराष्ट्राचा १६ आहे.
केरळचा मृत्यूदर सर्वात कमी
अर्भक मृत्यू दरामध्ये महाराष्ट्र राज्याचा देशातील ४ क्रमांक आहे. सन २०२० च्या अहवालानुसार अर्भक मृत्यू दरामध्ये केरळ राज्याचा दर ६, दिल्लीचा १२, तमिळनाडूचा १३ तर महाराष्ट्राचा १६ आहे.
नवजात शिशू स्थिरीकरण कक्ष, बाल उपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, घरच्या घरी नवजात शिशूची काळजी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, ॲनिमियामुक्त भारत, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान व नवसंजीवनी योजना याद्वारे हा मृत्यूदर कमी होत आहे. - डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य संचालक