बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा ‘खेडकर’पणा! ३५९ संशयित सरकारी नोकरांची यादी सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 06:48 AM2024-08-09T06:48:50+5:302024-08-09T06:49:26+5:30
दिव्यांग घटकासाठी शासनाने आरक्षण निश्चित केले आहे. या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळवूनही सरकारी नोकरी मिळते; मात्र या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्रे काढली जातात.
मुंबई : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आल्यानंतर आता ‘एमपीएससी’सह तलाठी भरती, वनविभाग, आरोग्य विभाग, डीएड, शिक्षक अभियोग्यता अशा अनेक परीक्षांत खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याचा दावा ‘स्टुडंट्स राइट्स असोसिएशन’ने केला आहे. अशी खोटी दिव्यांग प्रमाणपत्रे सादर केलेल्या तब्बल ३५९ संशयित सरकारी नोकरांची यादीच या संघटनेने दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तांना सादर केली आहे.
दिव्यांग घटकासाठी शासनाने आरक्षण निश्चित केले आहे. या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळवूनही सरकारीनोकरी मिळते; मात्र या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्रे काढली जातात.
‘स्टुडंट्स राइट्स असोसिएशन’ने १९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत ‘बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान’ राबविले होते. या अभियानातील संशयित उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करून बोगस असतील त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी या संघटनेने केली आहे. शिवाय ज्या संबंधित अधिकाऱ्याने बोगस प्रमाणपत्र काढण्यास मदत केली त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा, असे नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील खऱ्या दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या हक्काचे आरक्षण यावर गदा येणार नाही, याची काळजी आयोगाने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मुख्य परीक्षेच्या निकालाअगोदरच मेडिकल तपासणी व प्रमाणपत्र तपासणी पूर्ण करावी. तसेच यादीची चौकशी करून दोषींना शिक्षा करावी. - महेश बडे, स्टुडंट्स राइट्स असोसिएशन