समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाला आता जानेवारीचा मुहूर्त, डिसेंबरअखेर काम होणार पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 09:24 AM2022-10-29T09:24:36+5:302022-10-29T09:25:13+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्याची तयारी आहे.
- आशिष रॉय
नागपूर : समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा सुरू होण्यास आणखी विलंब होणार असून आता जानेवारीतच मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर ते शिर्डी हा द्रुतगती मार्ग डिसेंबरअखेर तयार होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्याची तयारी आहे. समृद्धी महामार्ग व नागपूर मेट्रोच्या सेंट्रल एव्हेन्यू-कामठी रोड या मार्गाचे लोकार्पण एकत्रित करण्यात येणार असल्यामुळे नागपूरकरांना आणखी काही दिवस मेट्रोच्या दोन फेऱ्यांपासून वंचित राहावे लागणार आहे.
मेट्रोचा रीच ४ (सेंट्रल अव्हेन्यू) फेब्रुवारीपासून तयार आहे. तर रीच २ (कामठी रोड) देखील गेल्या काही आठवड्यांपासून पूर्ण झाला आहे. या मार्गावर शहर बसने किंवा खासगी वाहनांनी प्रवास करणारे शेकडो प्रवासी याच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
इतके झाले आहे काम
समृद्धी महामार्गाच्या सध्या ५२० किलोमीटरच्या फेज-१ पैकी ४९१ किलोमीटरचा नागपूर-शिर्डी रस्ता वाहतुकीसाठी सज्ज आहे. नागपूर ते सेलू बाजारदरम्यान २१० कि.मी. आणि मालेगाव ते शिर्डीदरम्यान २८१ कि.मी.चा रस्ता तयार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीवर केवळ पुलाचे काम सुरू आहे. नोव्हेंबरअखेर पुलाचा एक कॅरेज वे तयार होऊन तो दुतर्फा करण्यात येणार आहे. दुसरा डिसेंबरअखेर पूर्ण होईल.