मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 06:23 IST2025-04-16T06:21:48+5:302025-04-16T06:23:27+5:30
Monsoon Prediction 2025: महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असेल, असे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे.

मान्सूनचा अंदाज 2025: यंदा भरभरून पाऊस, महाराष्ट्रातही सुखदसरी बरसणार
नवी दिल्ली : यंदा मान्सूनच्या काळात भारतातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल. यंदाचा हा अंदाज नेहमी दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्यासह महाराष्ट्राला दिलासा देणारा आहे. शिवाय, अल-निनोची स्थिती उद्भवण्याची शक्यता नसल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. (Maharashtra Monsoon Prediction 2025)
दुष्काळ पाचवीला पूजलेला मराठवाडा व तेलंगणामध्ये यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. तर, महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असेल, असे आयएमडीच्या अंदाजात नमूद करण्यात आले आहे. आयएमडीचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी हा अंदाज मांडला.
सरासरीच्या १०५ टक्के
- यंदा एकूण पाऊस दीर्घावधीतील ८७ सेमी सरासरीच्या १०५ टक्के राहील. अल-निनोचा अडसर यंदा नसेल.
- ३०% शक्यता सामान्य ३३% शक्यता अधिक व २६% शक्यता अत्यधिक पावसाची.
सरासरीपेक्षा कमी पाऊस
जम्मू आणि काश्मीर, लडाख, तामिळनाडू, बिहार, ईशान्य भारतातील काही भाग
सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त
मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
वाढत्या तापमानाचीही चिंता
सध्या देशातील अनेक भागांत तापमान वाढत चालले असून एप्रिलच्या मध्यापासून जूनपर्यंत प्रचंड उष्मा जाणवेल. यामुळे वीजनिर्मितीवर दबाव निर्माण होईल, शिवाय पाण्याची समस्याही जाणवेल.