औरंगजेब कबरीचा मुद्दा आता समयोचित नाही, रा. स्व. संघाची भूमिका : आंदोलकांचे टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 06:52 IST2025-03-20T06:50:14+5:302025-03-20T06:52:06+5:30

औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही अशी भूमिका संघाने मांडली आहे...

The issue of Aurangzeb's tomb is no longer timely, the role of the Rashtriya Swayamsevak Sangh: The ears of the protesters were pricked | औरंगजेब कबरीचा मुद्दा आता समयोचित नाही, रा. स्व. संघाची भूमिका : आंदोलकांचे टोचले कान

औरंगजेब कबरीचा मुद्दा आता समयोचित नाही, रा. स्व. संघाची भूमिका : आंदोलकांचे टोचले कान


नागपूर : राज्यभरात औरंगजेबाची कबर काढण्यावरून आंदोलने झाली. नागपुरात तर न भूतो न भविष्यति अशी जाळपोळ तसेच दगडफेक झाली. या मुद्द्यावरून राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांचे कान टोचले आहेत. औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही अशी भूमिका संघाने मांडली आहे.

खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर शासनाने लवकरात लवकर काढावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नागपूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांनी या मागणीसाठी आंदोलन केले. जनतेची भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने तातडीने या दिशेने पावले उचलावी, अशी भूमिका विहिंपतर्फे मांडण्यात आली आहे.

बंगळुरूत संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांना विचारणा केली असता त्यांनी औरंगजेबाचा मुद्दा समयोचित नाही असे स्पष्ट केले. कुठल्याही प्रकारची हिंसा ही समाजासाठी एकूण प्रकृतीसाठीच योग्य नाही. नागपुरातील जाळपोळ व दंगल प्रकरणात पोलिसांनी आवश्यक कारवाई केली असून सूत्रधारांचा शोध सुरू आहे. ते आरोपी शोधतील. मात्र समाजात सामाजिक सौहार्द राहिले पाहिजे हीच संघाची भूमिका आहे. अशा प्रकारची हिंसा व्हायलाच नको, असेदेखील आंबेकर यांनी स्पष्ट केले.

फहीम खानकडे शंकेची सुई
नागपूर हिंसाचार प्रकरणात लोकसभेची निवडणूक लढविलेल्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी शहराध्यक्ष फहीम खान शमीम खानवर पोलिसांची संशयाची सुई आहे. पोलिसांनी फहीम खानला ताब्यात घेतले असून, विविध बाजूंनी चौकशी सुरू आहे. 
फहीम खानविरोधात अगोदरपासूनच विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहे. हे गुन्हे २००९, २०२२, २०२३ या वर्षांत दाखल झाले होते. यात लैंगिक शोषणाचादेखील गुन्हा दाखल होता. लोकसभा निवडणुकीत त्याला १ हजार ७३ मते मिळाली होती.

बाराशेहून अधिक आरोपी : नागपूर हिंसाचारात पोलिसांनी बाराशेहून अधिक जणांना आरोपी केले. त्यात अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. आरोपींनी महिला पोलिसांचा विनयभंग करत पेट्रोल बॉम्बदेखील फेकल्याची बाब समोर आली आहे. 
 

Web Title: The issue of Aurangzeb's tomb is no longer timely, the role of the Rashtriya Swayamsevak Sangh: The ears of the protesters were pricked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.