अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 10:23 AM2024-10-04T10:23:44+5:302024-10-04T10:25:16+5:30

मुख्यमंत्री असताना १० जानेवारी २०१२ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक तज्ञ समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. - चव्हाण

The journey from the first committee to elite status of marathi... finally the success of the efforts since then | अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश

अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश

- पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मी केंद्रात मंत्री असताना 
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली यूपीए सरकारने १७ सप्टेंबर २००४ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात निर्णय घेऊन देशात काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णय घेतला. त्यासाठी साहित्य अकादमीने एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी निकष तयार करण्यास सांगितले. त्यानुसार आधी तामिळ आणि त्यानंतर संस्कृत, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा देण्यात आला. 

मी महाराष्ट्रात आल्यावर मुख्यमंत्री असताना १० जानेवारी २०१२ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक तज्ञ समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रंगनाथ पठारे यांना अध्यक्ष नियुक्त केले. त्या समितीत प्रा. हरी नरके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीकांत बहुलकर, प्रा. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, डॉ. कल्याण काळे, प्रा. आनंद उबाळे, परशुराम पाटील, डॉ. मैत्रेयी देशपांडे आणि राज्य सरकारच्या भाषे विषयक संस्थांच्या संचालकांची सदस्य म्हणून नेमणूक केली.  

समितीने पुराव्यानिशी अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले. सुरूवातीला त्यांच्या एकूण सात बैठका झाल्या. त्यानंतर डॉ. पठारे अध्यक्ष, प्रा. नरके हे समन्वयक आणि डॉ. बहुलकर व डॉ. देशपांडे हे सदस्य असलेल्या मसुदा उपसमितीची स्थापना करण्यात आली व त्यांच्यावर अहवाल लेखनाचे काम सोपवण्यात आले. या उपसमितीने १९ बैठका घेतल्या, तज्ज्ञांशी चर्चा करून प्राचीन ग्रंथांचे संदर्भ, प्राचीन लेख, शिलालेख, ताम्रपट अशा सर्वांचा सखोल अभ्यास करून त्यांनी ४३५ पानांचा एक अहवाल तयार केला. मे २०१३ मध्ये  तो अहवाल मला सादर केला.   

अभिजात भाषा समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो प्रथम इंग्रजी भाषेत भाषांतरीत करण्यात आला.  हा इंग्रजी अहवाल २०१३ मध्ये आम्ही केंद्राच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे पाठवला. त्यांनी तो अहवाल साहित्य अकादमीकडे सोपविला व त्यावर निर्णय मागविला. 
साहित्य अकादमीने अहवालाचा सखोल अभ्यास केल्यावर फेब्रुवारी २०१४ मध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबद्दल शिफारस करून अहवाल अंतिम निर्णयासाठी केंद्र सरकारकडे परत पाठवला. परंतु यानंतर लगेच लोकसभेच्या  निवडणुका जाहीर झाल्या आणि पुढे केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात देखील भारतीय जनता पक्षाचे स्थापन झाले. त्यावेळेस सांस्कृतिक कार्य मंत्री असलेल्या विनोद तावडे यांनी एक वर्षात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणार अशी घोषणा केली होती. परंतु, त्या प्रस्तावावर पाच वर्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. राज्यातील काही साहित्यिकांच्या मते मागील सरकारच्या कालावधीत पाहिजे तितका पाठपुरावा झाला नाही. आता महाराष्ट्रातील लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने १० वर्षे उशिरा हा निर्णय घेतला आहे. मी डॉ. रंगनाथ पठारे व त्यांच्या समितीच्या सदस्यांचे अभिनंदन करतो की त्यांच्या प्रयत्नांना अखेरीस यश आले. त्याच बरोबर सर्व मराठी साहित्यिकांचे धन्यवाद व्यक्त करतो.

Web Title: The journey from the first committee to elite status of marathi... finally the success of the efforts since then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.