राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफियांच्या घशात, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 05:41 PM2024-01-24T17:41:26+5:302024-01-24T18:09:55+5:30

Vijay Wadettiwar Criticize Maharashtra Government: महायुतीचे सरकार हिंदुत्वाचा गाजावाजा करत आहे. परंतु महायुती सरकारने राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफीयांच्या घशात घातल्या आहेत, यावरून महायुती सरकारचे हिंदुत्व, बेगडी असल्याचे सिध्द होत आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

The land of the temple in the state is in the throat of the land mafia, a serious allegation by Vijay Wadettiwar | राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफियांच्या घशात, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफियांच्या घशात, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

मुंबई - महायुतीचे सरकार हिंदुत्वाचा गाजावाजा करत आहे. परंतु महायुती सरकारने राज्यातील देवस्थानच्या जमिनी भूमाफीयांच्या घशात घातल्या आहेत. सरकारला पाठिंबा दिलेले लोकप्रतिनिधी या देवस्थान जमिन घोटाळ्यात सामिल आहेत. सरकार अशा घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे. देवस्थान जमिनींचे प्रश्न सोडवताना सरकार भूमाफीयांचे हितसंबंध जोपासत आहे. यावरून महायुती सरकारचे हिंदुत्व, बेगडी असल्याचे सिध्द होत आहे, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनाला जाण्याआधी सरकारने देवस्थान जमिनी भूमाफीयांच्या  विळख्यातून मुक्त कराव्यात, आजपर्यंत किती देवस्थानच्या जमिनी संबंधित देवस्थानला परत मिळवून दिल्या याबाबतचा लेखाजोखा सरकारने मांडावा,अशी मागणी वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.

श्री.वडेट्टीवार म्हणाले की, सरकारमधले मंत्री अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. परंतु दिव्याखाली अंधार अशी सरकारची अवस्था आहे. एकीकडे हिंदुत्वाचा गाजावाजा करायचा आणि दुसरीकडे मात्र देवस्थानच्या जमिनी गिळणाऱ्यांना अभय द्यायचे, असे सरकारचे दुटप्पी धोरण आहे. ज्या सरकारला हिंदूंच्या देवस्थानच्या जमिनींचे संरक्षण करता येत नाही त्या सरकारने हिंदुत्वाच्या गप्पा मारू नयेत, असे खडे बोल श्री. वडेट्टीवार यांनी सरकारला सुनवाले आहेत.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ज्या दानशूर व्यक्तींनी आपल्या जमिनी देवस्थानला दिल्या त्यांची नोंद तहसिल कार्यालयात असते. याबाबतचा आढावा महसूलमंत्री, अपरमुख्य सचिव (महसूल), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसचे मंत्रालयातील सहसचिव, उपसचिव यांनी घेतला पाहिजे. परंतु सनदी अधिकाऱ्यांवर सरकारचा वचक राहिला नसल्याने असा कोणताही आढावा घेतला जात नाही. उदात्त हेतूने दानशूर व्यक्तींनी देवस्थानला जमिनी दिल्या परंतु या जमिनींचे बेकायदा हस्तांतरण होत असताना सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे. देवस्थान जमिनींबाबतच्या शासन निर्णयाची राज्य शासन अंमलबजावणी करताना दिसत नाही. त्यामुळे या सरकारला हिंदुत्वाचा गाजावाजा करण्याचा अधिकार नाही, अशी खरमरीत टीका श्री. वडेट्टीवार यांनी सरकारवर केली. 

बीड जिल्ह्यातील देवस्थान जमीन घोटाळा राज्यभर गाजला आहे. महायुती सरकारने त्यास अभय दिले आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील वडाळी येथील महादेव संस्थानचा जमिन घोटाळा गाजत आहे. देवस्थान जमिनीची गैरमार्गाने विक्री परवानगी घेतली आहे. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी ही जमीन भूमाफियाच्या घशात घातली आहे. यामुळे धार्मिक संस्थानाचे विश्वस्त, भाविक यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. नोव्हेंबर महिन्यात आम्ही शासनाला याबाबतचे पत्र दिले आहे. तरी देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे या सरकारचे हिंदुत्व, बेगडी असल्याचा हा पुरावा आहे. अशा शब्दात श्री. वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले आहे.

Web Title: The land of the temple in the state is in the throat of the land mafia, a serious allegation by Vijay Wadettiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.