मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 05:41 PM2024-10-10T17:41:53+5:302024-10-10T17:42:48+5:30
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र पुढील काही दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होईल असा दावा सत्तेतील एका मंत्र्याने केला आहे.
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत तब्बल ८० निर्णयांचा धडाका महायुती सरकारने लावला. मागील काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय घेण्यात आले. त्यात आज झालेली बैठक शेवटची असावी, कारण पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होईल असा अंदाज मंत्री गिरीश महाजनांनी वर्तवला आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मंत्रिमंडळाची ही कदाचित शेवटची बैठक असणार आहे, त्यासाठी आम्ही जास्त निर्णय घेतले. तुम्ही मागील ५०-६० वर्षाचा इतिहास पाहिला तर नेहमी हे होते. अखेरच्या २-३ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका असतात त्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातात. त्यामुळे ही काही नवीन बाब नाही असं त्यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय
- वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार
- कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव
- सावनेर, गोंदिया, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदाच्या कामांना मान्यता
- वाचन संस्कृती, ग्रंथ चळवळ विकसित करणार
- नवीन महाविद्यालयांसाठी अर्जाची मुदत वाढवली
- राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार
- सिडको व पीएमआरडीएस दिलेले भूखंड गृहनिर्माण संस्थाच्या मालकीचे
- केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवणार
- बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी
- आपले सरकार केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांप्रमाणे मानधन
- कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधिनीला
- राज्यातील मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची व्यवस्था
- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार
- पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे
- महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा
- बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी ७०९ कोटींचा अतिरिक्त निधी