Deepak Kesarkar : ५५ आमदारांचा नेता १६ जण बदलू शकत नाही; आम्ही शिवसैनिकच; आमदार केसरकर रोखठोक बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 05:19 PM2022-06-25T17:19:36+5:302022-06-25T17:20:05+5:30

The leader of 55 MLAs can not change 16 people; We are Shiv Sainiks says MLA Deepak Kesarkar आम्हाला कुणीही सांगितले नाही, की तुम्ही असे करा. आम्ही स्वतःच हा निर्णय घेतला आहे आणि शिंदे साहेब हे आम्हाला नेते म्हणून उद्धव साहेबांनीच दिले आहेत, असे केसरकर म्हणाले.  

The leader of 55 MLAs can not change 16 people; We are Shiv Sainiks says MLA Deepak Kesarkar | Deepak Kesarkar : ५५ आमदारांचा नेता १६ जण बदलू शकत नाही; आम्ही शिवसैनिकच; आमदार केसरकर रोखठोक बोलले

Deepak Kesarkar : ५५ आमदारांचा नेता १६ जण बदलू शकत नाही; आम्ही शिवसैनिकच; आमदार केसरकर रोखठोक बोलले

Next

शिवसेनेचे मातब्बल नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण पार ढवळून निघाले आहे. आता शिवसेनेतील उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. यातच आता शिंदेगटातील आमदार दीपक केसरकर यांनी, आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. एकनाथ शिंदे हे आम्हाला नेते म्हणून उद्धव साहेबांनीच दिले आहेत. ५५ आमदारांचा नेता १६ लोक एकत्र येऊन बदलू शकत नाहीत, असे रोखठोक विधान आमदार केसरकर यांनी केले आहे.      

केसरकर म्हणाले, "अनेक वेळा संवाद नसला की, लोकांमध्ये  गैरसमज निर्माण होतात आणि हे गैसरमज निर्माण झाल्यानंतर त्याचे उत्तर देणे आवश्यक असते. एक गैसरमज असा आहे, की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो आहोत. पण, आम्ही अद्यापही शिवसेनेचेच सदस्य आहोत, मात्र अनेक वेळा पक्षाच्या आमदारांची जी मतं असतात त्या मतांनुसार काही निर्णय व्हावे लागतात. त्यांचे काही अधिकार असतात. त्यांचे मतदार संघ असतात. आपल्या राज्यात विविध कामे व्हावीत, अशी त्यांची अपेक्षा असते आणि ते सरकार चांगले चालावे अशी त्यांची इच्छा असते. जी आपली जबाबदारी आहे." 

आम्हाला आजही वाटते, की 'ते' आमचे ऐकतील -
"आम्ही अनेक वेळा आमच्या पक्ष प्रमुखांना सुचवले होते, की आपण एक निर्णय घेऊयात, की ज्या युतीत लढलो त्यांच्यासोबतच राहूया. आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून साहेबांना सांगत होतो. आम्हाला आजही वाटते, की ते आमचे ऐकतील. कारण ज्या वेळेला एवढे लोक सांगतात, एवढे लोक एकत्र येतात तेव्हा त्यात काही तरी अर्थ असणार. आम्हाला कुणीही सांगितले नाही, की तुम्ही असे करा. आम्ही स्वतःच हा निर्णय घेतला आहे आणि शिंदे साहेब हे आम्हाला नेते म्हणून उद्धव साहेबांनीच दिले आहेत, असे केसरकर म्हणाले.  

"शिंदे यांच्या संपर्कात सर्वच आमदार होते. आम्ही सर्वानी मिळून ठरवले की आपले मत असेच ठेवावे आणि आम्ही आमचे मत तसेच ठेवणार आहो. दोन तृतियांश बहुमताचा जो विषय आहे, तर घटनात्मक तरतूद अशी आहे, की जर तुम्हाला तुमचे मत वेगळे मांडायचे असेल तर त्यासाठी दोन तृतियांश बहुमत लागते. ते आमच्याकडे आहे." 

५५ आमदारांचा नेता बदलायचा असेल, तर तो १६ लोक एकत्र येऊन बदलू शकत नाहीत -
तसेच, "ज्या मिटिंग, पूर्वीचे नेते बदलण्यासंदर्भात झाल्या, त्यात १६ ते १७ आमदार उपस्थित होते. ज्यावेळी एखाद्या पक्षाचे रजिस्ट्रेशन होते. तेव्हा जेवढे निवडून आलेले आमदार असतात ते पक्षाचे आणि त्या गटाचे रजिस्ट्रेन करतात. त्यात आमची संख्या ५६ होती. आता ती ५५ झाली आहे. आणि ५५ आमदारांचा नेता बदलायचा असेल, तर तो १६ लोक एकत्र येऊन बदलू शकत नाहीत. त्यामुळे जो काही निर्णय उपाध्यक्षांनी दिला आहे. तो निर्णय आम्हाला मान्य नाही. आम्ही त्याला न्यायालयात चॅलेन्ज देणार आहोत. तसेच घटनात्मक दृष्ट्यासुद्धा ज्यांच्याकडे दोन तृतियांश बहुमत असते त्यांना आपला नेता निवडण्याचा अधिकार आहे, असेही केसरकर यांनी म्हटले आहे. 

आम्ही बाळासाहेबांचा विचार मांडणारी लोक एकत्र आलो आहोत -
"विधिमंडळातील शिवसेना पक्षाचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. कोणीही आपला पक्ष सोडलेला नाही. पक्षाचे नाव काय असेल, तर आम्ही अनेक लोकांशी चर्चा केली. हे पक्षाचे नाव नाही. आम्ही स्वतःला काय म्हणायचे? आम्ही असेच म्हटले, की शिवसेनेपेक्षा आम्ही वेगळे आहोत का? नाही. तर आम्ही बाळासाहेबांचा विचार मांडणारी लोक एकत्र आलो आहोत. आम्ही आमच्याकडे म्हणताना हे म्हणतो, पण आम्ही गटाचे नाव काही वेगळे मागितलेले नाही. शिवेसेनेत हे जे सदस्त आहेत त्यांची संख्या दोन तृतीयांश असल्याने त्याचे नेते एकनाथ शिंदे असतील," असेही केसरकर म्हणाले.

रस्त्यावर उतरण्याची भाषा केली जात आहे. त्याची गरज नाही. प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. रस्त्यावर उतरण्याची गरज नाही, असे आवाहनही केसरकर यांनी शिवसैनिकांना केले.
 

Web Title: The leader of 55 MLAs can not change 16 people; We are Shiv Sainiks says MLA Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.