एसटी महामंडळाचे चाक रुतलेलेच, अद्यापही १३ कोटींचा तोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 06:45 AM2022-07-11T06:45:39+5:302022-07-11T06:46:06+5:30
एसटीला अद्यापही १३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.
मुंबई : कोरोनाची साथ आणि संप काळानंतर एसटीचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पूर्ववत होत आहे. सामान्य परिस्थितीमध्ये एसटीचे उत्पन्न दैनंदिन २२ कोटी असायचे, तर प्रवासी संख्या ६५ लाख अशी होती. या तुलनेत सध्याचे दैनंदिन उत्पन्न १४ कोटींच्या जवळपास पोहचले आहे, तर प्रवासी संख्या दैनंदिन २७ लाखांवर पोहचली असून, एसटीला अद्यापही १३ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे.
सुमारे दोन हजार कोटींपेक्षा अधिक तोट्यात असताना कोरोनाची साथ आणि त्यानंतरच्या संपामुळे एसटी महामंडळ अधिकच डबघाईस आले होते. त्यामुळे दैनंदिन होणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम झाला. नियमित एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये घट झाली. एसटीला पर्याय म्हणून प्रवासीही काही काळासाठी खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळले होते. त्यामुळे भविष्यात प्रवासी एसटीकडे परततील का, अशी शंका उपस्थित केली जात होती.
एप्रिलमध्ये एसटीची नियमित सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी पुन्हा एकदा एसटीलाच पसंती दिली आहे. आगामी काळात उत्पन्न व प्रवासी संख्येत वाढीची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.