महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी होणार होता, पण...; काय म्हणाले दीपक केसरकर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 06:55 PM2023-04-20T18:55:11+5:302023-04-20T18:58:02+5:30

राज्यात उष्णतेची लाट असताना हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम भरदुपारी उन्हात का घेण्यात आला असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट भाष्य केले.

The Maharashtra Bhushan award ceremony was to be held in the evening, but...; What did Deepak Kesarkar say? | महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी होणार होता, पण...; काय म्हणाले दीपक केसरकर?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी होणार होता, पण...; काय म्हणाले दीपक केसरकर?

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारची कोंडी झाली आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत चालला आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सरकारने १४ कोटी खर्च केले मात्र श्रीसेवकांच्या मृत्यूमुळे विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे. 

राज्यात उष्णतेची लाट असताना हा पुरस्कार सोहळा कार्यक्रम भरदुपारी उन्हात का घेण्यात आला असा प्रश्न विचारला जात आहे. त्यावर मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट भाष्य केले. दीपक केसरकर म्हणाले की, श्रीसेवकांची वेगळी परंपरा राहिली आहे. ज्यावेळी श्रीसेवक येतात तेव्हा ते स्वत:चे पाणी, डब्बाही घेऊन येतात. अगदी साफसफाईचं काम केले तरी कचऱ्याचे वजन किती आहे, ते करून ते डंपिगला पाठवले जाते.  इतक्या पद्धतीशीरपणे ही अध्यात्माची चळवळ चालते. कार्यक्रमस्थळी पाण्याची सर्वत्र व्यवस्था केली होती. श्रीसेवक हे अप्पासाहेबांचे ऐकायला आले होते. जेव्हा एखादा भक्त देहभान विसरून भक्ती करत असतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. लाखो वारकरी दिंडीत चालतात. अनेकदा दुर्घटना झाली आहे. कुणी ठरवून हे करत नाही. उष्माघाताने कोकणात एकही बळी गेला नाही. हे पहिल्यांदाच घडलं आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच हा पुरस्कार सोहळा संध्याकाळी कार्यक्रम घ्यावा, असा प्रस्ताव दिला होता. परंतु श्रीसेवकांचा आग्रह होता संध्याकाळी कार्यक्रम घेतला असता तरी सकाळपासून ते तिथे बसणार होते. कार्यक्रमाच्या दिवशी रात्रभर तिथे लोकं मैदानात राहिली होती. ही अध्यात्माची ताकद आहे. त्यामुळे यात कुठलेही राजकारण करू नये. विरोधक जे सांगतायेत सरकारकडून माहिती लपवली जातेय तर असे काही नाही. हे जनतेचे राज्य आहे. यात कुठलीही गोष्ट दडून राहत नाही असं प्रत्युत्तर केसरकरांनी विरोधकांना दिले आहे. 

अजित पवारांनी लिहिलं राज्यपालांना पत्र
दरम्यान, या दुर्घटनेवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहून या घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी अशी मागणी केली आहे. अजित पवारांनी पत्रात म्हटलंय की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेत १४ निष्पाप अनुयायांचा मृत्यू झाला. मी स्वत: घटनेच्या दिवशीच रात्री उशिरा रुग्णालयात जाऊन रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या गंभीर घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करावी. या दुघर्टनेबाबत वेगवेगळी माहिती सोशल मीडियातून समोर येतेय. कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली व त्यात अनुयायांचा मृत्यू झाला. उपस्थितांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. ७ तास ते पाण्याशिवाय व अन्नाशिवाय होते. त्यामुळे अनेकांना उन्हाचा त्रास झाला. गर्दीचे योग्य नियोजन न केल्याने रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहचण्यास विलंब झाला. त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राज्यात उष्णतेची प्रचंड लाट असताना उघड्यावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी निवडण्यात आलेल्या कंपनीला अशा भव्य कार्यक्रम आयोजन करण्याचा अनुभव नव्हता. जाहीर करण्यात आलेल्या मृतांच्या संख्येपेक्षा अधिक अनुयायांचा मृत्यू झालाय असं समोर येत आहे. त्यामुळे सर्व बाबींचा शहानिशा करून त्यामधील सत्य जनतेसमोर येणे अत्यंत गरजेचे आहे असं पत्रात म्हटलं आहे. 
 

Web Title: The Maharashtra Bhushan award ceremony was to be held in the evening, but...; What did Deepak Kesarkar say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.