'लग्न जुळत आलं होतं, पण नवरदेवानं हुंडा जास्त मागितला आणि...' जानकरांबाबत शहाजीबापू म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 04:54 PM2024-04-25T16:54:00+5:302024-04-25T16:54:50+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: माढा लोकसभा मतदारसंघात मोठा जनाधार असलेले उत्तम जानकर हे कुठल्या गटात जातात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, भाजपाने खूप प्रयत्न केल्यानंतरही जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उत्तम जानकर यांच्याबाबत सूचक विधान केलं आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरत आहे. येथे भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात गेलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात मुख्य लढत होत आहे. तसेच या मतदारसंघामध्ये विविध नेत्यांच्या गटातटांना खूप महत्त्व आले आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात मोठा जनाधार असलेले उत्तम जानकर हे कुठल्या गटात जातात याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. दरम्यान, भाजपाने खूप प्रयत्न केल्यानंतरही जानकर यांनी शरद पवार गटात प्रवेश करत भाजपा आणि अजित पवार गटावर टीकेची तोफ डागली होती. त्यानंतर आता सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उत्तम जानकर यांच्याबाबत सूचक विधान केलं आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, काही विशेष घडलं नाही. लग्न जुळत आलं होतं. पण नवरदेवानं हुंडा एवढा मोठा मागितला की, ऐकणारे आम्ही केवळ बेशुद्ध पडायचे बाकी राहिलो होतो. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना एकच सांगितलं की, मी तत्त्वानं आणि निष्ठेनं राजकारण करतो. मदत करून मी अनेकांचं जीवन उभं केलं आहे. असल्या गोष्टी मला आवडत नाही. मी भविष्यात तुम्हाला मदत करीन आणि संकटातून बाहेर काढीन. पण अशा गोष्टी बोलणार असाल तर तुम्ही असेच परत निघा, मग काय आम्ही परत आलो.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात महायुतीमधूनच नाराजीचे सूर उमटले होते. त्यामधून धैर्यशिल मोहिते पाटील यांनी आपली वाट वेगळी केली आहे. तर आता रामराजे नाईक निंबाळकर तसेच शिंदे बंधू काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.