यंत्रणा होती, परंतू दुर्दैवाने वापरू शकलो नाही; एकनाथ शिंदेंनी सभागृहाला दिली इर्शाळवाडीची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:09 PM2023-07-21T16:09:17+5:302023-07-21T16:10:37+5:30
एकनाथ शिंदे काल इर्शाळवाडीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती जी पाहिली ती सभागृहाला सांगितली.
इर्शाळवाडीमध्ये १७ ते १८ घरांवर डोंगर कोसळला, एवढी अडचणीची जागा होती की आपल्याकडे यंत्रणा असून देखील आपण ती वापरू शकत नव्हतो. कालच्या दिवसभरात २० लोकांचे मृतदेह सापडले आहेत, तर ११९ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला सांगितले.
एकनाथ शिंदे काल इर्शाळवाडीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती जी पाहिली ती सभागृहाला सांगितली. यावेळी त्यांनी इर्शाळवाडीला गेल्याने काय काय मदत करता आल्याचे सांगितले. रात्री ११.३५ वाजता पहिली माहिती मिळाली. रात्री १२.४० सुमारास पहिली यंत्रणा पोहोचली होती. दुर्गम भाग, वादळवारा, पाऊस परिस्थिती यांमुळे परिस्थिती कठीण होती. NDRF ४ टीम, अन्य अनेक पथके, स्वयंसेवी संस्था, रेस्क्यू टीम यांनी मोलाची कामगिरी बजावली. गिरीश महाजन, दादा भुसे, उदय सामंत तत्काळ घटनास्थळी धावले. ३ वाजता गिरीश महाजन हे प्रत्यक्ष घटना घडली तिथे पोहोचले. अदिती तटकरे, अनिल पाटील हेही पोहोचले, असे शिंदे म्हणाले.
मी आलो तर यंत्रणा वेगाने काम करेल, वाटेत मला अमित शहांचा फोन आला, त्यांनी केंद्र काय मदत करू शकते हे विचारले. तसेच लष्कराची दोन मोठी वजन उचलणारी हेलिक़ॉप्टर तयार ठेवल्याचे त्यांनी सांगितले. याच हेलिकॉप्टरद्वारे आम्ही यंत्र सामुग्री पोहोचवू शकलो आहोत, असे शिंदे म्हणाले.
६०-७० कंटेनर मागविण्यात आले आहेत. त्यापैकी ३० कंटेनर पोहोचले आहेत. यात तेथील ग्रामस्थांची राहण्याची सोय करण्यात येत आहे. तातडीने पुनर्वसन करण्यासाठी जागा पाहिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले आहेत. सिडकोला या नागरिकांना वेगाने घरे बांधण्यास सांगितले आहे. सिडको या नागरिकांना घरे बांधून देणार आहे, असे शिंदे म्हणाले.
घटनास्थळी खूपच विदारक स्थिती होती. वरून माती उरकण्यासाठी लोक काम करत होते. परंतू, ढिगारा पाहता आणखी मनुष्यबळ लागणार होते. आम्ही सिडकोशी संपर्क साधला, तिथून शिर्के, एल एँडटी सारख्या कंपन्यांचे सुमारे १००० मजूर फावडा, टिकाव आणि अन्य यंत्रणेसोबत पाठविण्यात आले आणि बचावकार्याला वेग आला, असे शिंदे म्हणाले. हे साहित्य नेणाऱ्यांना सॅल्यूट करायला हवे, असे शिंदे म्हणाले.