Monsoon Update: येत्या पाच दिवसांत वाढणार मान्सूनचा जोर, मुंबई, ठाण्यात मुसळधार कोसळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 07:24 AM2022-06-18T07:24:31+5:302022-06-18T07:25:18+5:30
Monsoon Update: मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी आजही निम्मा महाराष्ट्र कोरडा आहे. मात्र, आता हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबई : मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला, तरी आजही निम्मा महाराष्ट्र कोरडा आहे. मात्र, आता हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, पुढील पाच दिवसांत राज्यात बहुतांश ठिकाणी मान्सूनचा जोर वाढेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. विशेषत: मुंबई आणि ठाण्यात पावसाचा जोर वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पावसाने शुक्रवारी उघडीप घेतली. गुरुवारी सकाळी मात्र पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला होता. दुपारी आणि सायंकाळी त्याने उघडीप घेतली आणि शुक्रवार सायंकाळपर्यंत कोरडा गेला. मुंबईतला पाऊस गायब होताच, येथील उन्हात आणि उकाड्यात वाढ झाली असून, वाहणाऱ्या घामाच्या धारांनी मुंबईकर ओलेचिंब होत आहेत.
नेमका अंदाज काय?
n कोकण, गोव्यात १९ ते २१ जूनदरम्यान तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
n मध्य महाराष्ट्रात २० आणि २१ जून रोजी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस.
n विदर्भात १८ ते २१ जूनदरम्यान मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस.
पाच दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या तीन दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे. - कृष्णानंद होसाळीकर,
अतिरिक्त महासंचालक, भारतीय
हवामान शास्त्र विभाग