वीज थकबाकीचा डोंगर ८३ हजार ४०६ कोटींवर, गेल्या अनेक वर्षांपासूनची थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 08:43 AM2024-01-17T08:43:24+5:302024-01-17T09:14:24+5:30
कृषी पंपांची थकबाकी ६० हजार कोटींवर गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी आहे.
मुंबई : राज्यभरातील वीज ग्राहकांकडून बिले भरली जात नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढतच असून, आजघडीला कृषी पंपासह एकूण थकबाकीचा आकडा ८३ हजार ४०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर कृषी पंपांची थकबाकी ६० हजार कोटींवर गेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही थकबाकी आहे.
राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्तचा हा कृषिपंपाचा आकडा असून, ४ हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंतची बिले भरलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाढत असलेली कृषिपंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी राज्यभरात वसुली मोहीम वेगाने सुरू आहे.
महावितरणने विकलेल्या विजेचे पैसे जर मिळाले नाहीत तर थकबाकीचा डोंगर वाढतच जाईल. त्यामुळे ज्यांनी वीज वापरली आहे; त्यांनी वापरलेल्या विजेचे बिल भरले पाहिजेत. शेतकऱ्यांना वाटल्यास शासनाने अनुदान दिले पाहिजे.
- कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन
राज्यभरात थकबाकीची वसुली मोहीम सुरू आहे. मात्र आम्ही सरकारकडे वेतन वाढून मागू किंवा इतर मागण्या मांडू तेव्हा सरकार थकबाकीकडे बोट दाखवते. थकबाकी वसुली होऊ द्या, असे सांगितले जाते.
- राकेश जाधव, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशन, इंटक