धनगर समाजातील नवविवाहित जोडपं थेट मनोज जरांगेंच्या भेटीला पोहचले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:28 IST2023-09-08T17:28:30+5:302023-09-08T17:28:49+5:30
मी ओबीसी कॅटेगिरीतील धनगर समाजातील तरूण आहे. परंतु मला वाटते १ मराठा, लाख मराठा, शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावे हीच माझी कळकळीची विनंती आहे असं या नवरदेवाने म्हटलं

धनगर समाजातील नवविवाहित जोडपं थेट मनोज जरांगेंच्या भेटीला पोहचले अन्...
जालना – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा बांधव रस्त्यावर उतरले आहे. अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर हे आंदोलन पेटले. राज्यभरातून जालनातील पोलीस लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने मराठा आरक्षण मुद्द्याला आणखी बळ मिळाले आहे.
मागील १० दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण आजही सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र आजही जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच आहे. त्यात आज बीडच्या गेवराई तालुक्यातील धनगर समाजातील नवविवाहित जोडपे थेट जरांगे पाटील यांच्या भेटीला जालना येथे पोहचले. लग्नानंतर देवदर्शनाला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी ते येथे आले होते.
जरांगेच्या भेटीला आलेले जोडपे म्हणाले की, मला घरच्यांनी आग्रह केला देवदर्शनासाठी जा, पण त्याअगोदर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन घेतल्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलोय. ३३ कोटी देवांपैकी जरांगे पाटील हे एक साक्षात आहे असा मला वाटते. मला १ दिवसाचा उपवास सहन होत नाही. जरांगे पाटील इतके दिवस उपाशी आहे. शासनाने यावर लवकर निर्णय घ्यावा, मराठ्यांना आरक्षण मिळायला हवे. मी ओबीसी कॅटेगिरीतील धनगर समाजातील तरूण आहे. परंतु मला वाटते १ मराठा, लाख मराठा, शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावे हीच माझी कळकळीची विनंती आहे असं या नवरदेवाने म्हटलं. त्याचसोबत विखे पाटील यांच्यासोबत जी घटना घडली ती घडायला नको होती. परंतु शासनाने धनगर समाजालाही एसटी प्रवर्गातून लवकरात लवकर आरक्षण द्यावी अशी मागणीही नवरदेवाने केली.