शपथ घ्या, पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल; धनंजय मुंडेंचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 05:30 PM2023-06-21T17:30:45+5:302023-06-21T17:31:54+5:30
पक्षाला २५ वर्ष होत असताना तरुणाला लाजवेल इतके काम शरद पवार करतायेत. तरुणाईला राष्ट्रवादीत खूप संधी आहे असंही धनंजय मुंडे म्हणाले.
मुंबई - महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटक पक्ष आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनवायचाय. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी नंबर वन असेलच पण राज्याचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घ्या अशा शब्दात माजी मंत्री आणि राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून रौप्य महोत्सवीवर्षानिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात धनंजय मुंडे म्हणाले की, सध्या जातपात धर्म यात लढाई सुरू आहे. जातीजातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण केला जातोय. अमरावतीच्या घटनेचे पडसाद कोल्हापूरात उमटतात याचा अर्थ काय? तुम्हाला जर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचा कळवळा आहे. मग ९०० वर्ष मुघलांनी देशावर राज्य केले, तरी हिंदु देशात संघटित आणि अखंडित राहिला, हिंदूंना कधी मोर्चा काढावा लागला नाही. मग गेल्या १० वर्षात हिंदूंचे मोर्चे स्वत:चे रक्षण करण्यासाठी निघत असतील तर कोण देशात सुरक्षित आहे? असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच शरद पवार हे आपले दैवत आहे, ५६ व्या वर्ष समाजासाठी काम करतायेत, पक्षाला २५ वर्ष होत असताना तरुणाला लाजवेल इतके काम शरद पवार करतायेत. तरुणाईला राष्ट्रवादीत खूप संधी आहे. मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्याचा अभिमान वाटतो. ज्या ज्यावेळी शरद पवारांचे समाजकारण आणि राजकारण पाहायला मिळते तर शरद पवार हे विद्यापीठ आहेत. स्वराज्यात ज्यापद्धतीने महिलांना सन्मान होता तेव्हा राज्यात महिलांना सन्मान देण्याचं काम शरद पवारांनी केले असं कौतुक मुंडेंनी भाषणात केले.
दरम्यान, आमच्यासारख्यांनी कधीही स्वप्नात मंत्री होऊ ही महत्त्वकांक्षा राजकारणात ठेवली नाही. पण आम्हाला मंत्रिपदे देऊन महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा घडवून आणली. ते शरद पवारच करू शकतात. संकटे अनेक आहेत. तेलंगणातील बीआरएस, वंचित येतेय. येणाऱ्या काळात राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ नंबरचा झाला पाहिजे. न्यूज अरेना नावाचा सर्व्हे आला, पण न्यूज अरेना इंडिया कुणाची आहे हे काढले तर ती भाजपाची असून पायात साप सोडायचे काम करतात तशी ही संस्था आहे. त्यात काही खरे नाही असंही धनंजय मुंडे यांनी सांगितले.