"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 01:24 PM2024-10-01T13:24:34+5:302024-10-01T13:25:56+5:30

राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळे पक्ष आपापली रणनीती आखत आहेत. त्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून चूरस निर्माण झाली आहे. 

The next CM Of Maharashtra will be from Congress, Prithviraj Chavan statement will increase Uddhav Thackeray headache | "राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?

"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि भाजपाला पराभूत करणं ठाकरेंचं मुख्य टार्गेट आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले परंतु सर्वाधिक जागा लढवून ठाकरेंना अवघ्या ९ जागा जिंकता आल्या. लोकसभेतील निकालामुळे मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव वाढला आहे. त्यातून विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी आग्रही मागणी केली. मात्र त्या मागणीलाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून धुडकावण्यात आलं. 

येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल असं जाहीर विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. हे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे. लोकसभेचा निकाल पाहिला तर सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. सर्वात जास्त स्ट्राईक रेट काँग्रेसचा आहे. ६५ टक्के जागांवर लोकसभेत आघाडी आहे, याचा अर्थ विधानसभेच्या २८८ जागांपैकी १८३ जागांहून अधिक आपल्याला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच राज्यात महायुतीचा गलथान कारभार सुरू आहे. हे सरकार आपल्याला घालवावं लागेल. हे सरकार जाणार आहे. विदर्भात धुव्वा उडणार आहे. मराठवाड्यात दलित, मुस्लीम आणि मराठा आरक्षणकर्त्यांनी सरकारला घालवलं आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं दिसून येते. ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र हा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना मान्य नाही. जर हे केले तर पाडापाडी अधिक होते असं उद्धव ठाकरेंचं ठाम मत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा यासाठी ते आग्रही होते. 

काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जाते. त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री केले जावे यासाठी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी एकसूर लावला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत कार्यकर्ते उत्साही असतात, त्याप्रकारे मागणी केली जाते. मात्र हायकमांड मुख्यमंत्री ठरवतील असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केले. बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर्स झळकत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अनेकजण इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. 

Web Title: The next CM Of Maharashtra will be from Congress, Prithviraj Chavan statement will increase Uddhav Thackeray headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.