अखेर ‘पंतप्रधाना’ला मिळाला जन्म दाखला; बाळाला तीन महिन्यांनी मिळाले नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 12:38 PM2022-02-18T12:38:08+5:302022-02-18T12:38:26+5:30
पंतप्रधान या नावाचा जन्म दाखला द्यायचा कसा, या संभ्रमात आरोग्य विभाग पडला.
गुणवंत जाधवर
उमरगा (जि. उस्मानाबाद) : जन्मानंतर तब्बल तीन महिने पदनामाच्या फेऱ्यात अडकून पडलेला चिंचोली भु. येथील पंतप्रधानाचा जन्म दाखला अखेर मुक्त झाला आहे. आरोग्य विभागाने पंतप्रधान हे नाव संविधानिक पदनाम असल्याने तो लटकून ठेवला होता. मात्र, हा गुंता सुटल्याने गुरुवारी पंतप्रधानाच्या पालकांना जन्म दाखला सुपूर्द करण्यात आला.
चिंचोली भु. येथील दत्ता व कविता चौधरी या दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले. या नावाचा जन्म दाखलाही त्यांना मिळाला. तसे आधार कार्डही त्यांनी बनवून घेतले. यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामणी (जि. सोलापूर) येथे त्यांना दुसरे बाळ झाले. या बाळाचे त्यांनी बारसे घालून ‘पंतप्रधान’ असे नामकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात दत्ता चौधरी यांनी जन्म दाखला मिळण्याकरिता २७ नोव्हेंबर २०२१ रोजी अर्ज केला. मात्र, पंतप्रधान या नावाचा जन्म दाखला द्यायचा कसा, या संभ्रमात आरोग्य विभाग पडला. येथील आरोग्य केंद्राकडून ‘पंतप्रधान’ हे संविधानिक पदनाम असल्यामुळे या नावाचा जन्म दाखला द्यावा किंवा कसे, याबाबत मार्गदर्शनासाठी सोलापूरच्या जिल्हा निबंधक, जन्म-मृत्यू तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे १ डिसेंबर रोजी पत्र पाठवले होते. तोपर्यंत या बालकाचे पिता दत्ता चौधरी हे जन्म दाखल्यासाठी चकरा मारत होते. तीन महिने उलटून गेल्यावर या जन्म दाखल्यावर मोहोर उमटली. गुरुवारी पंतप्रधानाच्या पित्याकडे जन्म दाखला तयार करून सुपूर्द करण्यात आला.
माझ्या पहिल्या मुलाचा ‘राष्ट्रपती’चा जन्म दाखला मिळाला आहे. या नावाने आधार कार्डही बनवून घेतले आहे. मात्र, पंतप्रधानाच्या वेळी हे संविधानिक पदनाम असल्यामुळे सदरील बालकास हे नाव देता येईल का? याबाबत मार्गदर्शन मिळावे, या आशयाचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवलेल्या पत्राची प्रत मला देण्यात आली होती. त्यामुळे काही काळ मी वाट पाहिली. मात्र, पाठपुरावा सोडला नाही. अखेर आज या नावाचा जन्म दाखला प्राप्त झाला. - दत्ता चौधरी, पालक