महायुतीचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचलेले नाही - एकनाथ खडसे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 11:32 AM2024-06-03T11:32:36+5:302024-06-03T11:32:49+5:30
भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या एकनाथ खडसेंची आगपाखड; महायुतीला फटका बसण्याचा दावा
जळगाव : राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जागा जास्त येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. याचा अर्थ महायुतीच्या माध्यमातून झालेले फोडाफोडीचे राजकारण हे जनतेला रुचलेले नाही, असा दावा आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी केला.
शरद पवार गटातून बाहेर पडलेल्या खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनी भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचारही केला होता. मात्र, आता खडसेंनी महायुतीला टार्गेट केल्याने ते पुन्हा भूमिका बदलणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
नेमके काय म्हणाले खडसे?
लोकसभा निवडणुकीसाठी एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यात राज्यात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीच्या जास्त जागा येत असल्याचे खडसे म्हणाले.
राज्यातील जनतेला महायुतीच्या माध्यमातून झालेले फोडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही. तसेच, कापूस व सोयाबीनला न मिळालेला दर या कारणांमुळेही महायुतीच्या जागा कमी येत असल्याचे निरीक्षण खडसे यांनी नोंदविले.
राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही संभ्रमात...
भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनीही खडसेंसोबत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर, आता शरद पवार गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. जे पदाधिकारी खडसेंसोबत राष्ट्रवादीत आले होते. ते अजूनही शरद पवार गटातच आहेत.
मात्र, एकनाथ खडसे हे शहरात आल्यानंतर किंवा काही ठिकाणी आल्यानंतर शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे खडसे नेमके कोणत्या पक्षात जातील किंवा थांबतील, याबाबत शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे.