साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
By कमलाकर कांबळे | Published: April 27, 2024 07:30 PM2024-04-27T19:30:31+5:302024-04-27T19:30:54+5:30
Shashikant Shinde Latest Update: एफएसआय घोटाळाप्रकरणी शशिकांत शिंदेंसह २५ जणांवर गुन्हा दाखल. दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात अन्य एक संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील एफएसआय घोटाळ्याप्रकरणी सातारा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांद शिंदे यांच्यासह तत्कालिन सचिव सुधीर तुंगार आणि इतर २३ संचालक अशा २५ जणांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी शिंदे यांच्यावर सुमारे दहा कोटींच्या कथित शौचालय घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल असून ते जामीनावर बाहेर आहेत. अशातच दोन दिवसांपूर्वी याच घोटाळ्यात अन्य एक संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली होती. हे ताजे असाताच शनिवारी असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शिदे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
किंबहुना सातारा लोकसभा मतदारसंघात शिंदे यांच्या विरोधात वातावरण तापविण्यासाठी शनिवार-रविवारची सुटी हेरून हा गुन्हा दाखल केल्याी चर्चा बाजार समिती आवारात आहे.
एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील ४६६ गाळेधारकांना २००९ मध्ये वाढीव एमएसआय देताना एपीएमसी प्रशासनाचे ६५ कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे. या गाळेधारकांना वाढीव एफएसआयसाठी प्रति चौरस फुटासाठी ६०० रुपयांचा दर तत्कालीन संचालक मंडळाने आकारला होता. रेडिरेकनरचा त्यावेळचा दर प्रति चौरस फूट ३०६६ रूपये असताना फक्त ६०० रूपये आकारल्याने शासनाचे ६२ कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ठपका शशिकांत शिंदे यांच्यासह मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे २४ संचालक आणि तत्कालीन सचिव सुधीर तुंगार अशा २३ जणांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम ३४, ४०६, ४०९ आणि ४२० अन्वये आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची २००९ पासून चौकशी सुरू होती. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
या २५ जणांवर झाला आहे गुन्हा दाखल
एमीएमसीच्या मसाला मार्केटमधील कथित एफएसआय घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यासह तत्कालिन संचालक नारायण काळे, विजय रामचंद्र देवतळे, भानुदास एकनाथ कोतकर, दत्तात्रेय रामचंद्र पाटील, प्रदीप गंगाराम खोपडे, प्रभू गोविंद पाटील, अशोक देवराम वाळूंज, शंकर लक्ष्मण पिंगळे, किर्ती अमतलाल राणा, जयेश वसनजी वोरा, साेन्याबापू जनार्दन भुजबळ, विलास दशरथ मारकड, बाळासाहेब हणमंतराव सोळसर, भीमकांत बाळाराम पाटील, पांडुरंग पुरुषोत्तम गणेश, विलास रंगरावजी महल्ले, संजय नारायण पानसरे, चित्रा दिंगबर लुंगारे, बेबीनंदा प्रभाकर रोहिणकर, जितेंद्र अंकुश देहाडे, चंद्रकांत रामदास पाटील, राजेश गंगारधरराव देशमुख व तत्कालिन सचिव सुधीर तुंगार यांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल झालेले संचालक शरद पवार यांच्या गटातील असून त्या त्या जिल्ह्यात मोेठे राजकिय वजन आहे. यातील काही जण त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक लोकसभा निवडणुकीत प्रभाव टाकू शकतात. हे हेरून सत्ताधारी महायुतीने आता घाईघाईने हा गुन्हा केल्याची चर्चा आहे.