ज्या जिल्ह्यातून जास्त विरोध तिथे दबावाचं राजकारण; ठाकरे गटाचा एकनाथ शिंदेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:30 PM2022-10-12T12:30:25+5:302022-10-12T12:31:02+5:30
ज्या जिल्ह्यातून सरकारविरोधात जास्त आंदोलन होत आहेत. त्याठिकाणी दबावाचं राजकारण सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाने केला.
कोल्हापूर - बोगस शपथपत्राच्या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचची टीम कोल्हापूरात तपासासाठी दाखल झाली. ठाकरे गटाकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात बोगस शपथपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. मुंबईत माहिम परिसरात पोलिसांनी धाड टाकून बनावट स्टँम्प जप्त केले होते. या प्रकरणावर शिवसेनेचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रतिक्रिया देत सरकारविरोधात गंभीर आरोप केला.
संजय पवार म्हणाले की, आमच्याकडे १० विधानसभा मतदारसंघात ज्या सूचना आल्या त्याप्रमाणे प्रामणिकपणे स्टँम्प घेऊन नोटरी करून प्रतिज्ञापत्रे सादर केली आहे. आता कुणी खोडसळपणाने याबाबत तक्रार केली असेल तर त्याबाबत आमचा नाईलाज आहे. शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे प्रतिज्ञापत्रे सादर केलीत. आमच्या मनात कुठलीही शंका नाही. सरकारी कामकाज आहे. त्यांच्या कामात आम्ही अडथळा आणणार नाही. आम्ही चुकीचं काही केले नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच तपासात काही चौकशी करायची असेल तर आमची तयारी आहे. कोल्हापूरातून माझ्या मतदारसंघातून १४८० प्रतिज्ञापत्रे सादर केलीत. ज्या जिल्ह्यातून सरकारविरोधात जास्त आंदोलन होत आहेत. त्याठिकाणी दबावाचं राजकारण सुरू आहे. परंतु आमचा कारभार स्वच्छ असल्याने जे काही चौकशी करायची असेल ते करू द्या आम्ही सहकार्य करू अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
वांद्रे परिसरात जवळपास ४ हजार ६८३ बनावट प्रतिज्ञापत्र सापडल्याने खळबळ उडाली. त्यात बनावट स्टॅम्पचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत तपास सुरू आहे. तक्रारदार हे घर खरेदीच्या काही कागदपत्रांसाठी ते वांद्रे कोर्ट परिसरात गेले होते. तेव्हा त्यांना ए के मार्ग परिसरात अर्चिज गॅलरी दुकानासमोर दोन नोटरी बसले होते. त्यांनी कुतूहलापोटी त्यांच्यासमोरील काही कागदपत्र उचलून पाहिली. तेव्हा स्टॅम्प पेपरच्या मागील बाजूस अटेस्टेड आणि त्याखाली स्टॅम्प मारून त्यात ते सह्या करत असल्याचे दिसले. त्यावर आधार कार्डची छायांकित प्रत आणि संबंधित कार्डधारकाचा फोटोही लावण्यात आला होता. मात्र, नोटरीसमोर प्रत्यक्षात कोणी व्यक्ती उभी नव्हती. त्यानंतर दोन दिवस त्याठिकाणी चकरा मारल्या असता तेव्हाही तेच काम सुरू होते. तेव्हा स्टॅम्प पेपरवर बनावटीकरण होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
निर्मल नगर पोलीस ठाण्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जे एकूण स्टॅम्प पेपर हस्तगत करण्यात आले आहेत, त्यात फक्त तीन स्टॅम्प पेपर असे आढळले आहेत ज्यामध्ये संबंधित व्यक्तीचे नाव लिहीत त्यापुढे ‘मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे’ असा मजकूर लिहिलेला आहे. त्यामुळे पोलीस याप्रकरणी राजकीय अंगानेही तपास करत आहेत. निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रे सादर करण्यासाठी ठाकरे गटाकडून ही बनावट प्रतिज्ञापत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. हे सर्व ‘मातोश्री’च्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही शिंदे गटाने केली आहे.