दबावाचे राजकारण तापले; अनिल देशमुख यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 06:39 AM2024-07-25T06:39:16+5:302024-07-25T06:39:38+5:30
'देशमुख जेलमध्ये होते, आता बेलवर बाहेर आहेत. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी माझ्याजवळ आहेत, माझ्या नादी लागू नका' असा पलटवार फडणवीस यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : 'महाविकास आघाडीच्या चार नेत्यांविरुद्ध प्रतिज्ञापत्राद्वारे आरोप करण्यासाठीचा दबाव देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर एका व्यक्तीमार्फत आणला होता', असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी केल्याने राजकीय वातावरण तापले. त्यातच भाजपचे नेते गिरीश महाजन यांना गुन्ह्यात अडकविण्यासाठी देशमुख यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यावर दबाव आणला होता, अशी बाब समोर आली. 'देशमुख जेलमध्ये होते, आता बेलवर बाहेर आहेत. त्यांच्याबाबत अनेक गोष्टी माझ्याजवळ आहेत, माझ्या नादी लागू नका' असा पलटवार फडणवीस यांनी केला.
देशमुख काय म्हणाले? महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी मला पैसा गोळा करायला सांगितले होते, आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर रेप करून तिला बाल्कनीतून ढकलून दिले, असे प्रतिज्ञापत्र तयार करा. गुटखा प्रकरणात अजित पवारांविरुद्ध तसेच अनिल परब यांच्याविरुद्धही प्रतिज्ञापत्र सादर करा असा दबाव एका व्यक्तीला पाठवून फडणवीस यांनी केला होता. मी त्याला नकार दिला म्हणून मला अटक करण्यात आली. माझ्याकडे आलेली ती व्यक्ती कोण ते मी वेळ आल्यावर सांगेन.
फडणवीस यांचे प्रत्युत्तर
अलीकडच्या काळात काही सुपारीबाज लोक घुसलेले आहेत, श्याम मानव त्यांच्या नादी तर नाही लागले ना? गिरीश महाजनांवर गुन्हे दाखल करण्यासाठी कसा दबाव आणला गेला, याचे ऑडिओ, व्हिडीओ मी सीबीआयला दिले होते. सीबीआयने देशमुखांविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात सगळे आले आहे. गृहमंत्री असताना देशमुख हे उद्धव ठाकरे, शरद पवार, वाझेबद्दल काय बोलले त्याचे ऑडिओ व्हिडीओ त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी आणून दिले होते. देशमुख यांना माझे हेच सांगणे आहे की, मी पुराव्याशिवाय काहीही बोलत नसतो, असे फडणवीस म्हणाले.
सीबीआयचा तपास अहवाल कोर्टात सादर
पुणे : तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगावचे तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त प्रवीण मुंढे यांच्यावर टाकलेल्या दबावामुळे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल झाले, असे सीबीआयने तपास अहवालात नमूद केले आहे. हा अहवाल बुधवारी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्यापुढे सादर करण्यात आला.
विजय पाटील नामक व्यक्त्तीने केलेल्या तक्रारीवरून माझ्यावर गुन्हा दाखल करावा असा दबाव अनिल देशमुख यांनी आणला होता. मुंढे यांनी सीबीआयकडे तसा जबाब दिलेला आहे.
आरोपांच्या फैरी : खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर दबाव आणला गेला होता, असा दावा सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केला. त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. अनिल देशमुख तीन वर्षांनंतर का बोलत आहेत, असा सवाल भाजपचे नेते प्रवीण दरेकर, नितेश राणे, शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी केला.
- गिरीश महाजन, मंत्री, भाजप