विनायक मेटे अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 01:13 PM2022-08-15T13:13:14+5:302022-08-15T13:14:26+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला गाडीने धडक दिली.
मुंबई - माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणी वाहन चालक एकनाथ कदम यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मेटेंचे वाहनचालक कदम यांचा डोळा लागल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून मेटेंचे वाहनचालक आणि ट्रक ड्रायव्हरची एकत्रित चौकशी करणार आहेत. ज्या ट्रकाला विनायक मेटेंचे वाहन आदळले त्या ट्रकचालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विनायक मेटे यांच्या वाहनाचा ज्या ट्रकसोबत अपघात झाला. तो घटनास्थळावरून पसार झाला होता. त्यानंतर रायगड पोलिसांनी ट्रक चालकाचा शोध घेतला. तेव्हा तो ट्रक पालघर जिल्ह्यात असल्याचं कळालं. त्यानंतर पालघर पोलिसांनी पथक पाठवून दमन येथून ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले. रात्री उशिरा पालघर पोलिसांनी ट्रक चालकाला रायगड पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर आता विनायक मेटेंचा वाहन चालक आणि ट्रक ड्रायव्हरची एकत्रित चौकशी करण्यात येणार आहे. एकनाथ कदम हा विनायक मेटेंच्या कारचा चालक असून त्याचा डोळा लागल्याने हा अपघात घडल्याचा पोलिसांना अंदाज आहे. त्यामुळे मेटेंच्या वाहनचालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
नेमकं काय घडलं?
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भातण बोगद्याजवळ मेटे यांच्या गाडीला अपघात झाला. जखमी झालेल्या मेटे यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील जेजे रुग्णालयात सायंकाळी मेटे यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी बीड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मेटे मुंबईला येत होते. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मेटे यांच्या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. पुढे असलेल्या कंटेनरला गाडीने धडक दिली. चालकाच्या मागील सीटवर बसलेले मेटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर बराच काळ ते घटनास्थळी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होते. अखेर पोलिसांना माहिती मिळताच एका रुग्णवाहिकेतून त्यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात आणले. अपघातात मेटे यांचे अंगरक्षक राम ढोबळे हेही गंभीर जखमी झाले असून, चालक एकनाथ कदम याला किरकोळ इजा झाली आहे.