दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 11:32 IST2025-02-27T11:29:56+5:302025-02-27T11:32:33+5:30
BJP Mahayuti Govt News: नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे कायम राहणार असल्याचे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीवरून स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे.

दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार?
BJP Mahayuti Govt News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठे यश मिळाले. मात्र, यानंतर मंत्रिमंडळ, खातेवाटप आणि पालकमंत्रीपदावरून महायुतीत चांगलेच मानापमान नाट्य रंगले. नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदावरून महायुतीतील पक्षातच आरोप-प्रत्यारोप झाले. रायगड पालकमंत्रीपदावरून तर शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. या तिढा कधी सुटणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेले असताना नाशिकचे पालकमंत्री पद भाजपाकडे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून अंतर्गत धुसपूस सुरू झाल्यानंतर या दोन ठिकाणच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. यानंतर रायगडचे पालकमंत्रीपद मिळावे, यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच सुनील तटकरे यांच्यावर बोचरी टीका केली. परंतु, याबाबत आता दिल्लीत सूत्रे हलली आहेत. नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडेच राहण्याबाबत दिल्लीतून निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार?
नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे कायम ठेवले जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री पद अन्य कोणाकडे दिले जाणार नाही, असा भाजपाच्या दिल्लीतील नेतृत्वाने स्पष्ट संदेश दिल्याचे समजते. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघेही अडून बसल्याने हा तिढा सुटू शकलेला नाही. पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, शिवसेना शिंदे गटाने या दोन्ही नियुक्त्यांना आक्षेप घेतला होता. यानंतर या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.
अमित शाह यांच्याकडून मध्यस्थीचे प्रयत्न
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दिल्लीतील उच्चपदस्थांकडे तक्रार केल्यावर २४ तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. स्थगिती देण्यात आल्यापासून महिनाभरापेक्षा अधिक काळ यावर तोडगा काढण्याचे भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रयत्न सुरू आहेत. या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पातळीवरही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, रायगडमध्ये पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले अडून बसले आहेत. पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही तयारी नसल्याचे म्हटले जात आहे. दुसरीकडे, नाशिकमध्ये सर्वाधिक आमदार असतानाही पालकमंत्रीपदावरचा दावा आम्ही मागे घेतल्याने रायगडचे पालकमंत्रीपद आमच्याकडे कायम राहावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केली आहे. यावर तोडगा म्हणून गोगावले वा तटकरे या दोघांऐवजी तिसऱ्याची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.