रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
By संतोष आंधळे | Published: May 29, 2024 05:58 AM2024-05-29T05:58:51+5:302024-05-29T05:59:58+5:30
अधीक्षकांच्या हाताखाली अधिकाऱ्यांची फौज, अधीक्षकाचे अधिकार काय असतील, वाचा...
संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयातील महत्त्वाचे मानले जाणारे वैद्यकीय अधीक्षक पद हे आता वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार आहे. त्यामुळे अधिष्ठातांच्या अधिकारांवर गदा आल्याचे सध्या वैद्यकीय वर्तुळात बोलले जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक पद हे अधिष्ठातांच्या मर्जीनुसार भरण्यात येेत होते. त्या पदावर अनेकवेळा सहयोगी प्राध्यापक असणाऱ्या अध्यापकांना देण्यात येत होते. मात्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमानुसार वैद्यकीय अधीक्षक पद हे प्राध्यापक दर्जाच्या अध्यापकाला देणे बंधनकारक असताना नियमाची पायमल्ली करून हे पद कुणालाही देण्यात येत होते. त्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाची परवानगी घेण्याची गरज नव्हती.
वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय अधीक्षक पद हे प्राध्यापक संवर्गातून भरण्यात येते. प्राध्यापक हे गट - अ पद असून, त्या पदाचे ‘नियुक्ती प्राधिकारी’ हे शासन असल्यामुळे त्या पदाची नियुक्ती किंवा अतिरिक्त कार्यभाराचा आदेश शासन स्तरावरून काढणे अपेक्षित आहे. त्यामुळे यापुढे अधीक्षक पदावरील व्यक्तीची नियुक्ती असल्यास वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांमार्फत प्रस्ताव शासनास सादर करावे, या आशयाचे पत्र काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले आहे तसेच त्या राज्यातील सर्व अधिष्ठातांना पाठविण्यात आले आहे.
सध्याच्या घडीला राज्यात २५ वैद्यकीय महाविद्यालय कार्यरत असून, प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक पद आहे. रुग्णालयात अधिष्ठातांच्या नंतर सर्वांत महत्त्वाचे पद हे अधीक्षकाचे आहे. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयाची सर्व जबाबदारी अधीक्षकांकडे असते. रुग्णालयाचे व्यवस्थापन, रुग्ण व्यवस्था, रुग्णालय परिसरातील संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था, रुग्णाशी संबंधित सगळ्या गोष्टी त्यामध्ये रुग्णालयातील सर्व वॉर्ड्सचे प्रश्न हे अधीक्षक बघत असतात. रुग्णालयात आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी अधीक्षक कार्यालयाकडेच असते.
हे ठरविणार अधीक्षक
वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व अधिष्ठातांना अधीक्षक पद शासन स्तरावरून भरणार असल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानंतर आता रुग्णालयाचे अधीक्षक पद हे आता मंत्री कार्यालयातून भरले जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या डॉक्टरांमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे.
अधीक्षकांच्या हाताखाली अधिकाऱ्यांची फौज
रुग्णालयातील व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे, याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येते. यापैकी हे सर्व अधिकारी हे अधीक्षकांच्या सूचनेनुसार काम करत असतात. अतितत्काळ विभागात वैद्यकीय अधिकारी तीन पाळ्यांमध्ये काम करत असतो. रुग्णालयात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या आरोग्य तपासणीसाठी हे अधिकारी अनेकदा काम करताना आढळतात.