सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 06:02 AM2024-11-22T06:02:54+5:302024-11-22T06:04:02+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महायुती बहुमताने सरकार स्थापन करणार  : एकनाथ शिंदे, मतटक्का वाढल्याचा महायुतीलाच फायदा: देवेंद्र फडणवीस, मविआचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार : नाना पटोले.

The power is ours! Claims by leaders of the ruling Grand Alliance and the opposition Mavia  | सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 

सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 

मुंबई/नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आपलीच सत्ता येणार असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. या नेत्यांचे दावे किती खरे किती खोटे याची स्पष्टता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी सकाळी येणार आहे.

जनता महायुतीच्या बाजूने; मुख्यमंत्र्यांचा दावा 

गेल्या पाच वर्षांचा कारभार महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. २०१९ मध्ये चुकीच्या पद्धतीने सरकार स्थापन झाले. ती घटना जनता अद्याप विसरलेली नाही. 

जनता भरभरून विकासाला मतदान करेल. पूर्ण बहुमताचे महायुतीचे सरकार स्थापन होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आम्ही लाडकी बहीणसह अनेक योजना सुरू केल्या. सर्वसामान्य, शेतकरी, कामगार व ज्येष्ठांसाठी योजना घोषित केल्या. या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीने प्रयत्न केले. त्यामुळे जनता आमच्या बाजूने उभी आहे, असेही शिंदे म्हणाले.

टक्केवारीतील वाढ हा ‘प्रो इन्कबन्सी फॅक्टर’ 

राज्यात मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा भाजप व मित्रपक्षांना फायदाच होईल व महायुतीचेच सरकार येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला. 

मतदानाची टक्केवारी वाढली की भाजप व मित्रपक्षांना त्याचा फायदा होतो हा आजपर्यंतचा अनुभव आहे. टक्केवारी वाढल्याने हा ‘प्रो इन्कबन्सी फॅक्टर’ आहे. सरकारबाबत आपुलकी वाढली आहे. महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे, असे प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे, असे फडणवीस म्हणाले. 

मुख्यमंत्रिपदाबाबत निकाल आल्यानंतर तीनही पक्षांचे नेते बसतील व योग्य निर्णय घेतील. कुठल्याही अपक्षांशी अद्याप संपर्क साधला नसल्याचेही फडणवीस म्हणाले. 

आम्ही १०५ पेक्षा जास्त जागा जिंकू. तिघांचे आमदार मिळून बहुमत नक्की मिळेल. अपक्षांची गरज भासली नाही, तरी त्यांना सोबत घेऊ, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.   

मतदानासाठी जनतेचा दांडगा उत्साह दिसून आला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल आणि काँग्रेस पक्ष सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. २५ नोव्हेंबरला आघाडीचा नेता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

एक्झिट पोल फ्रॉड आहेत. हरयाणामध्ये काँग्रेस ६० च्या वर जागा जिंकेल, तर लोकसभेला भाजप ४०० पार जाईल असा एक्झिट पोल होता, पण काय झाले? राज्यात महाविकास आघाडीला १६० पेक्षा जास्त जागा मिळतील, बहुमत आमच्याकडेच असेल. त्यामुळे निकालाच्या दिवशी २३ तारखेलाही आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू शकतो. - संजय राऊत, नेते, उद्धवसेना

मोठ्या बहुमताने महाविकास आघाडीचे सरकार येईल. भाजपचा राष्ट्रीय नेता पैशांसोबत सापडतो याने सिद्ध होते की, भाजप या निवडणुकीत काय करत आहे. हे महाराष्ट्राला खरेदी करायला निघाले आहेत. २३ तारखेला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा कळेल की, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानाने जपणारे राज्य आहे. -जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शरद पवार गट

मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये तीन संस्थांनी महायुतीला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे. मलाही विश्वास आहे महायुतीचे शतप्रतिशत सरकार येईल. -छगन भुजबळ, नेते अजित पवार गट

Web Title: The power is ours! Claims by leaders of the ruling Grand Alliance and the opposition Mavia 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.