राज्यातील सत्ताप्रयोगाचा महायुतीला होणार त्रास, निवडणुकीआधी नेते महाविकास आघाडीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:28 AM2024-08-22T07:28:12+5:302024-08-22T07:29:15+5:30

कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल मतदारसंघातील भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत.

The power struggle in the state will cause trouble to the Maha Alliance, before the elections, the leaders will join the Maha Vikas Aghadi | राज्यातील सत्ताप्रयोगाचा महायुतीला होणार त्रास, निवडणुकीआधी नेते महाविकास आघाडीकडे

राज्यातील सत्ताप्रयोगाचा महायुतीला होणार त्रास, निवडणुकीआधी नेते महाविकास आघाडीकडे

मुंबई : राज्यात जून २०२२ मध्ये भाजप-शिंदेसेना सरकार आले आणि नंतरच्या वर्षी अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. तीन पक्ष असे एकत्र आल्याने सत्ता तर मिळाली; पण आता पुन्हा सत्ता मिळविताना नेमके तीन पक्षांचे असे एकत्र येणे अडचणीचे ठरू लागले आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागायला सुरुवात झाली आहे.  

कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल मतदारसंघातील भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे हे शरद पवार गटाच्या वाटेवर आहेत. कारण, तेथे महायुती ही मंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देणार हे उघड आहे. त्यामुळे घाडगे यांना भाजप सोडण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्ता भरणे आमदार आहेत आणि तिथे भाजपचे गेल्यावेळी पराभूत झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. 

तिथे दोघांपैकी एकालाच महायुती संधी देऊ शकणार असल्याने इंदापूरही कागलच्या वाटेवर जाईल, अशी चिन्हे आहेत. लातूर जिल्ह्यातील उद्गीरचे आमदार व राज्याचे मंत्री संजय बनसोडे यांना महायुतीची उमेदवारी मिळणार हे लक्षात आल्याने माजी आमदार व भाजपचे नेते सुधाकर भालेराव आधीच शरद पवार गटात गेले आहेत. रामटेक मतदारसंघातील अपक्ष व शिंदेसमर्थक आमदार आशिष जयस्वाल यांना महायुतीने उमेदवारी दिल्यास तेथील भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी बंडाच्या तयारीत असल्याचे म्हटले जाते.

दहा मतदारसंघांमध्ये राजकीय पेच 
  गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमध्ये गेल्यावेळी केवळ ८१८ मतांनी पराभूत झालेले माजी मंत्री भाजपचे राजकुमार बडोले यांच्यासमोरही राजकीय भवितव्याचा प्रश्न आहे. कारण, तेथे अजित पवार गटाचे मनोहर चंद्रिकापुरे आमदार आहेत.
  बडनेरा (जि. अमरावती) येथे अपक्ष आमदार रवी राणा हे भाजपसोबत आहेत. तिथे भाजपचे आ. श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय यांनी कोणत्याही परिस्थितीत लढणारच, असा पवित्रा घेतला आहे. अशा आणखी किमान दहा मतदारसंघांमध्ये महायुतीसमोर असा पेच राहील.

Web Title: The power struggle in the state will cause trouble to the Maha Alliance, before the elections, the leaders will join the Maha Vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.