मुंबईत पहाटेपासून धो-धो, तळकोकणातही पावसाची हजेरी; राज्यात काय स्थिती, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:31 AM2023-06-24T11:31:37+5:302023-06-24T11:56:58+5:30
Rain In Maharashtra: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
मुंबई: मुंबईत सकाळपासूनही मुंबईतील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. ठाण्यासह नवी मुंबईतही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
तळकोकणात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला असून आज सकाळपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, माणगावसह अनेक भागात जोरदार पाऊस पडत आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून लांबला असला तरी आता तो महाराष्ट्रात दाखल झाला असून पुढील आठवड्यात राज्यात दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकणात पावसाचे जोरदार आगमन
समुद्रामध्ये घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे थांबलेला पाऊस कोकणात पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. सकाळपासून पावसाची जोरदार संततधार चालू झाली असून यामुळे शेतकरी सुखावला आहे. पेरणी केलेल्या शेतीला आता पूरक पाऊस पडण्याचे चित्र दिसत आहे.
पुण्यात वरुणराजाचे आगमन
एकीकडे पाऊस नाही आणि दुसरीकडे उष्णतेने पुणेकर हैराण होते. पण आता अखेर शहरात ढगाळ वातावरणानंतर पाऊस झाल्याने पुणेकर सुखावले आहेत. हवामान खात्याने यंदा मान्सून उशिरा येणार असल्याचा अंदाज दिला होता. पण, एवढा उशीर करेल, याची कल्पना कोणालाच नव्हती. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत अनेकदा सायंकाळी पावसाने हजेरी लावलेली. दुपारी उकाडा आणि सायंकाळी पावसाचा दिलासा, अशी स्थिती पुणेकरांनी अनुभवली. तापमानाचा पाराही चाळिशीच्या पार पोहोचला होता. जूनमध्ये साधारणपणे शंभर ते दीडशे मिमीच्या दरम्यान पावसाची सरासरी असते. यंदा मात्र विदारक चित्र आहे.
बुलढाण्यात रात्री पावसाचे आगमन, तर सर्वत्र धुक्याची चादर
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या आगमनामुळे सुखावला असून शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर आज सकाळी बुलढाणा शहरात धुके पडल्याचे पाहायला मिळाले आहे. हवामान तज्ञांनी पुढील पाच दिवस जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. वाहन चालकांना धुक्यामुळे नीट रस्ताही दिसत नव्हता. रस्त्याचा अंदाज घेत दिवे सुरू ठेऊन वाहनांची वाहतूक संथगतीने सुरू होती.पाच-दहा फुटांवरील घरे, इमारती, वाहनेही धुक्यामुळे दिसत नव्हती. उन्हाच्या उकाडय़ामुळे रात्री झालेल्या पावसाने नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे.