प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 08:54 AM2022-06-10T08:54:01+5:302022-06-10T08:55:27+5:30
teacher : पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रिया पारदर्शक होईल, असा दावा मुश्रीफ यांनी केला. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे राजेशकुमार म्हणाले.
मुंबई : जिल्हा परिषद शाळांमधील दोन लाख प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी सांगितले.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे या शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यंदाच्या बदल्यांसाठीच्या ऑनलाइन प्रणालीचा प्रारंभ मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेशकुमार, उपसचिव का. गो. वळवी आदी उपस्थित होते.
पूर्वी शिक्षकांची बदली करताना विविध समस्या निर्माण होत होत्या. आता ऑनलाईन प्रक्रियेमुळे बदली प्रक्रिया पारदर्शक होईल, असा दावा मुश्रीफ यांनी केला. देशातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे राजेशकुमार म्हणाले.
या बदल्यांबाबत अनियमिततेची तक्रार आल्यास त्याचा निपटारा करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.
आंतरजिल्हा बदली
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी कर्मचाऱ्यास किमान पाच वर्षे सलग सेवा होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पक्षघात, दिव्यांग कर्मचारी, शस्त्रक्रिया झालेले, विधवा, कुमारिका शिक्षक, परित्यक्ता तसेच वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी त्याचबरोबर पती-पत्नी एकत्रिकरण आदींसह विशेष संवर्ग शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.
जिल्हांतर्गत बदली
जिल्हांतर्गत बदली करताना ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण आणि विद्यमान शाळेत पाच वर्षे पूर्ण झाली आहे, अशा शिक्षकांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पक्षाघाताने आजारी, दिव्यांग , शस्त्रक्रिया झालेले , विधवा, कुमारिका, परित्यक्ता-घटस्फोटीत महिला, व्याधीग्रस्त शिक्षकांबरोबरच पती-पत्नी एकत्रिकरण आदींना अर्ज करावा लागणार आहे.