"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 11:23 IST2025-04-21T11:21:58+5:302025-04-21T11:23:09+5:30
Sanjay Raut News: महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांपासून दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना असल्याचं सांगितलं आहे.

"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र यावं, अशी इच्छा दोन्ही पक्षातील नेते. पदाधिकारी आणि कार्यकर्ते वारंवार व्यक्त करत असतात. दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र येण्यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता राजकारणामुळे दुरावलेले हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. तसेच ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना असल्याचं सांगितलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संजय राऊत यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रं हातात घ्यावीत, आतापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या. ही आतापर्यंतची लोकभावना होती आणि आहे. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तीच भावना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही व्यक्त केली आहे. दोघांनीही आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. जेव्हा प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात, तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून येत असलेल्या प्रतिक्रियांवरूनही संजय राऊत यांनी टीका केली, ते म्हणाले की, आता काही लोकांना त्याविषयी वेदना होणार. कारण उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आले, त्यांनी एकत्र राजकारण केलं, तर आम्हाला कायमचं शेतावर जावं लागेल. आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल, असं काही जणांना वाटतं, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आहे. तसेच आजही करतंय. पिढ्या बदलल्या, पण हे प्रेम काही कमी होत नाही. त्यामुळे काही जणांना भीती वाटत आहे. त्यातून त्यांच्या पोटामधून काही मळमळ बाहेर येत आहे. त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतोय, तसेच या घडामोडींकडे आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, या विषयावर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आमच्याकडून कुठलाही नेता काहीही बोललेला नाही. आम्ही ठरवलं आहे की, कुणीही काहीही बोलून द्या आपण भूतकाळात डोकावून पाहायचं नाही. हा आमचा फॉर्म्युला आहे. एक पाऊल पुढे टाकायचं, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. हे पाऊन पुढे टाकताना मागे काय झालं त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे. मागे काय बोललो, काय टीका केली, हे विसरायला पाहिजे. यलाच सकारात्मक दृष्टीकोन म्हणतात, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच याबाबत सकारात्मकता ठेवा, असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.