पाऊस गेला, गारठा वाढला; किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 08:05 AM2022-10-26T08:05:54+5:302022-10-26T08:06:14+5:30
महाबळेश्वरमधील गेल्या १० वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची मंगळवारी नोंद झाली.
पुणे : पावसाचा मुक्काम लांबल्याने यंदा ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही. त्यामुळे आता थेट थंडीचे आगमन झाले असून राज्यातील सर्वच विभागांतील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊ लागली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वांत कमी किमान तापमान १२.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ३.२ अंशाने कमी आहे.
महाबळेश्वरमधील गेल्या १० वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील सर्वांत कमी किमान तापमानाची मंगळवारी नोंद झाली. याअगोदर ऑक्टोबर महिन्यात महाबळेश्वर येथे २६ ऑक्टोबर २०१४ रोजी १२.४ अंश सेल्सिअसइतकी सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ३४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.
परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने यंदा ऑक्टोबर हिट जाणवलीच नाही. आता तापमानात घट होत आहे. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी व कोकण, गोव्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली. विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली.
प्रमुख शहरात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे १३.७, जळगाव १३.५, कोल्हापूर १७.५, नाशिक १८.४, सांगली १६.६, १४.१, सोलापूर १६.२, मुंबई २३.४, रत्नागिरी १९.२, उस्मानाबाद १६, औरंगाबाद १४.२, परभणी १६.८, नांदेड १७.२, अकोला १७.६, अमरावती १४.३, चंद्रपूर १७.६, गोंदिया १७, नागपूर १५.४, वर्धा १५.७.