ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप व फडणवीस सरकार, नाना पटोलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 03:09 PM2022-05-07T15:09:22+5:302022-05-07T15:10:15+5:30

Nana Patole : भाजपचा डीएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे. आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजप दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.  

The real killers of OBC's political reservation are BJP and Fadnavis government, Nana Patole's attack | ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप व फडणवीस सरकार, नाना पटोलेंचा हल्लाबोल

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी भाजप व फडणवीस सरकार, नाना पटोलेंचा हल्लाबोल

Next

मुंबई : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर भाजपला आता आलेला कळवळा हा केवळ दिखावा आहे. ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस केवळ भाजप  व देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत. भाजपचा डीएनए ओबीसी नसून ओबीसीविरोधी आहे. आता ओबीसी आरक्षणाबद्दल भाजप दाखवत असलेले प्रेम हे ‘पुतणा मावशीचे प्रेम’ आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.  

देशातील आरक्षण संपवणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा अजेंडा आहे आणि तो काही लपून राहिलेला नाही. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा आज जो पेच निर्माण झाला आहे त्याची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांनीच केली. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार असताना २०१७ साली नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोश्टर क्लिअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. हे प्रकरण न्यायालयात गेले, त्यानंतर भंडारा जिल्हा परिषदेसह इतर जिल्हा परिषदाही न्यायालयात गेल्या. २०१८ साली उच्च न्यायालयाने सांगितले होते की आयोग बसवा परंतु तत्कालीन फडणवीस सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले. महाविकास आघाडी सरकार यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु त्यासाठी आवश्यक असणारा ओबीसींचा डेटा देण्यास केंद्रातील मोदी सरकारनेही नकार देऊन महाराष्ट्र सरकारची कोंडी केली, असे  नाना पटोले यांनी सांगितले.

मध्यप्रदेश मध्ये जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला, तेव्हा मात्र केंद्रातील मोदी सरकराने त्या सरकारला मदत करण्याची भूमिका घेतली. महाराष्ट्रात भाजपाविरोधी सरकार असल्याने केंद्राने मदत केली नाही. देवेंद्र फडणवीस व भाजप ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडत आहेत. दोन वर्षे काय केले असा प्रश्न विचारत आहेत. मग फडणवीस सरकारने पाच वर्षे काय केले? त्यांनी आयोग गठीत का केला नाही? इम्पिरिकल डेटामध्ये असंख्य चुका आहेत असा दावा करणाऱ्या फडणवीसांनी मोदी सरकारक़डे हा डेटा कशासाठी मागितला होता? आणि त्याच डेटाचा वापर मोदी सरकार सरकारी योजना राबवण्यासाठी का करत आहे? हे प्रश्न उपस्थित होतातच, असे नाना पटोले म्हणाले.

याचबरोबर, मंडल आयोग लागू केल्यानंतर इतर मागासवर्गीय समाजाला २७ टक्के आरक्षण लागू झाले. या निर्णयाला देशभर भाजपनेच तीव्र विरोध केला होता हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह जे भाजपा नेते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला दोष देत आहेत त्यांनी आधी आपला इतिहास तपासून पहावा. ओबीसींच्या आरक्षणाचा मारेकरी भाजप आहे, त्याचे खापर दुसऱ्यांवर फोडून भाजप आपल्या पापातून मुक्त होऊ शकत नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: The real killers of OBC's political reservation are BJP and Fadnavis government, Nana Patole's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.