'मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड'; शिंदेंनी महानोर यांना वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 11:03 AM2023-08-03T11:03:10+5:302023-08-03T11:04:23+5:30

गेल्या काही दिवसांपासून ना. धों. महानोर प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते.

'The real man behind the curtain of time singing the song of the soil'; CM Eknath Shinde paid tribute to N.D Mahanor | 'मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड'; शिंदेंनी महानोर यांना वाहिली श्रद्धांजली

'मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड'; शिंदेंनी महानोर यांना वाहिली श्रद्धांजली

googlenewsNext

निसर्गाशी एकरूप होऊन काव्यलेखन करणारे, बोली भाषेला आपल्या साहित्यात स्थान देऊन ते लोकप्रिय करणारे ज्येष्ठ कवी, लेखक ना. धों. महानोर (वय ८०) यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मूळ गावी पळसखेडे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून ना. धों. महानोर प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. त्यांना किडनीचा त्रास होता. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वाला धक्का बसला आहे. निसर्गकवी, रानकवी म्हणून त्यांना ओळखले जात असत. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. राज्यातून अनेकजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ना.धों. महानोर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

''या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे'', असं म्हणत निसर्गातील चैतन्याचे गान मांडणारे, मातीशी नाळ घट्ट जोडून आभाळाला गवसणी घालणारे रानकवी ना. धो. महानोर यांच्या निधनाने मातीचे गीत गाणारा अस्सल माणूस काळाच्या पडद्याआड गेल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

अक्षरे आणि मातीचे नाते, जोडलेपण आपल्या लेखणीतून मांडून त्यांनी अक्षरश: कवितेचे अंकुर फुलवले. त्यांच्या साहित्यकृतींना मातीचा अस्सल गंध होता. राज्य सरकारचा कृषीभूषण आणि केंद्र सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. महानोर यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. या वेदनादायी प्रसंगातून सावरण्यासाठी कुटुंबीयांना ईश्वर बळ देवो, अशी प्रार्थना करतो, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटरद्वारे म्हटलं आहे.

नामदेव धोंडो महानोर हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेडा गावात झाला. तर जळगावात त्यांचं शिक्षण झालं. महाविद्यालयीन शिक्षण सोडून ते शेतीत रमले. त्यांच्या रानातील कवितांनी सर्वांनाच निसर्गाच्या प्रेमात पाडलं. 'दिवेलागणीची वेळ','पळसखेडची गाणी','जगाला प्रेम अर्पावे','गंगा वाहू दे निर्मळ' ही त्यांची लोकप्रिय कवितासंग्रह आहेत. तर 'एक होता विदूषक','जैत रे जैत','सर्जा','अजिंठा' या काही सिनेमांमध्ये त्यांनी गीतरचना केली.  महानोर १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून नियुक्त झाले. तर १९९१ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

Web Title: 'The real man behind the curtain of time singing the song of the soil'; CM Eknath Shinde paid tribute to N.D Mahanor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.