"जातीय राजकारणाचा पाया रचणाऱ्यांची राजवट आज धुळीला मिळत आहे..."- सदाभाऊ खोत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 06:03 PM2024-12-04T18:03:44+5:302024-12-04T18:04:34+5:30
...ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे."
विधानसभा निवडणुकीत महायुतीला अतिप्रचंड यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीसच विराजमान होणार हे निश्चित झाले आहे. तत्पूर्वी, आज पक्ष निरीक्षक म्हणून राज्यात आलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. यानंतर आता सदाभाऊ खोत (sadabhau khot) यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थाने धुळीला मिळत आहे -
सदाभाऊ म्हणाले. "महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा तारणहार, शेतकऱ्यांचा योद्धा, जलनायक, बहुजनांना बरोबर घेऊन जाणारा आणि खेड्यापाड्यातील जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आता मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभत आहे." यावेळी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधताना सदाभाऊ म्हणाले, "ज्याने या महाराष्ट्रात जातीय राजकाराणाचा पाया रचला त्या शरद पवारांची राजवट आज खऱ्या अर्थाने धुळीला मिळत आहे. ती राजवट आज त्यांच्या डोळ्यासमोर, रावणाची सोन्याची लंका जळावी, तशी जळायला लागली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे." तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राम राज्याला सुरुवात होत आहे. याचा आनंद मला आणि गावगाड्यातील प्रत्येक माणसाला आहे," असेही सदाभाऊ यावेळी म्हणाले.
'त्या' लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत... -
"सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, "खरे तर आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे शिपाई अथवा सैनिक म्हणून मैदानात लढत होतो. जसे अभिमंन्यूला चक्रव्यूहात अडकवले गेले, तेसेच अनेक चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस यांच्या बोवती तयार करण्यात आलेले होते. ते सर्व चक्रव्यूह तोडण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या जीवाची बाजी लावली. खरे तर ती लढाईच होती आणि ती लढाई आम्ही लढत होतो. त्या लढाईतून आमचा अभिमन्यू पुन्हा येत आहे, याचा आंदत आम्हा दोघांना (सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर) अधिक आहे."